Manjara Dam : मांजरा धरणाची शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल | पुढारी

Manjara Dam : मांजरा धरणाची शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल

कळंब; परमेश्वर पालकर : – उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यासह बीड जिल्ह्य़ातील केज, अंबाजोगाई, धारूर, लातूर या शहरांना पाणीपुरवठा करणारे व कळंब, केज, अंबाजोगाई, लातूर या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सदृढ करणारे मांजरा धरण 91 टक्के भरले आहे.  बारा ते चोवीस तासात पूर्ण क्षमतेने भरेल, असा अंदाज धरणाचे शाखा अभियंता सूरज निकम यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.

धरण 90 टक्क्यांच्या पुढे सरकल्याने याच्या लाभक्षेत्रातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मांजरा धरणात 122.91 घनमीटर /सेकंद आवक आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असाच पाऊस राहिला तर संध्याकाळपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरेल. पण  पाऊस जरी नाही झाला तरी आहे त्या आवकेचा विचार केला तर चोवीस तासात धरण भरेल असा अंदाज धरणाचे शाखाअभियंता सुरज निकम यांनी व्यक्‍त केला आहे.

प्रशासनाचा  इशारा

मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरून पाण्याचा विसर्ग कधीही होऊ शकतो. याबाबत लातूर पाटबंधारे विभागाने दि 9/10 /22 रोजीच पत्र काढून उस्मानाबाद, बीड, लातूर, बिदर जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. तसेच कळंब येथील तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी सर्व तलाठी यांनाही याबाबत सूचना केल्या आहेत.  नदीच्या काठावर वस्ती करून राहत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह सुरक्षित ठिकाणी येण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

गेल्या वर्षी बोलवावे लागले होते हेलिकॉप्टर 

गेल्या वर्षी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस झाल्याने नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने तालुक्यातील सौंदणा (अंबा) येथे हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले होते व वाकडी येथे एनडीआरएफची टीम बोलवावी लागली होती. यावेळी जनावरांना सुद्धा घराच्या छतावर आश्रय घ्यावा लागला होता. त्यामुळे यावेळी सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button