लग्‍नानंतर पत्‍नीने कामावर जाणे म्‍हणजे क्रौर्य नव्‍हे : मुंबई उच्‍च न्‍यायालयाने पतीची घटस्‍फोटाची मागणी फेटाळली | पुढारी

लग्‍नानंतर पत्‍नीने कामावर जाणे म्‍हणजे क्रौर्य नव्‍हे : मुंबई उच्‍च न्‍यायालयाने पतीची घटस्‍फोटाची मागणी फेटाळली

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लग्‍नानंतर पत्‍नीने कामावर जाण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम १३ अंतर्गत क्रूरता ठरणार नाही, असे मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठाने स्‍पष्‍ट केले. ( Divorce case) पत्‍नी कामावर जाण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करते म्‍हणून घटस्‍फोट मिळावा अशी मागणी करणारी पतीची याचिकाही न्‍यायालयाने फेटाळली.

नाेकरी करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केल्‍याने पतीची घटस्‍फाेटाची मागणी

पत्‍नी कायम कामावर जाण्‍याचा आग्रह करते. या कारणातून तिच्‍याशी अनेकदा भांडण होते. तसेच जोपर्यंत नोकरीला जावू दिले जाणार नाही तोपर्यंत मूल होवू देणार नाही, अशी धमकीही पत्‍नी देते. त्‍यामुळे तिच्‍यापासून घटस्‍फोट मिळावा, अशी याचिका पतीने मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या नागपूर खंडपीठात दाखल केली होती. यावर न्‍यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्‍यायमूर्ती उर्मिला जोशी -फाळके यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

पत्‍नीवर मुलाला जन्‍म देण्‍यासाठीची सक्‍ती करु शकत नाही

पत्‍नीची योग्‍यता असेल तर तिने नोकरी करण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त करणे म्‍हणजे क्रूरता नाही. त्‍यामुळे पतीला घटस्‍फोटासाठी हे कारण पुरेसे ठरत नाही. त्‍यामुळे या कारणातून पतीचा छळ होत असले असे दिसत नाही. पतीने केलेल्‍या आरोप केल्‍यानुसार क्रूरतचे आणखी एक कारण म्‍हणजे त्‍याच्‍या पत्‍नीने परस्‍पर गर्भपात केला.  भारतीय राज्‍यघटनेतील कमल २१ नुसार प्रजनन निवडीचा स्‍त्री देण्‍यात आलेला अधिकार हा तिच्‍या वैयक्‍तिक स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे. त्‍यामुळे पती हा पत्‍नीवर मुलाला जन्‍म देण्‍याासाठीची सक्‍ती करु शकत नाही, असेही खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

 पत्‍नीचा दावा अधिक ग्राह्य वाटतो

पत्‍नीने लग्‍नानंतर चार वर्षांनी घर सोडून निघून गेल्‍याचे पतीने याचिकेत म्‍हटले होते. यावर न्‍यायालयाने म्‍हटलं की, पत्‍नीला पुन्‍हा घरी आणण्‍यासाठी पतीकडून फारसे प्रयत्‍न झाल्‍याचे दिसत नाहीत. पत्‍नीला पतीसाेबतचे नाते कायमचे संपुष्‍टात आणायचे आहे, हे दाखविणारा कोणताही पुरावा नाही. नोकरी करण्‍याची तिची इच्‍छा होती. यासाठी तिने पतीचे घर सोडले, असा दावा पतीने केला आहे. मात्र घर सोडताना तिला कोणतीही नोकरी नव्‍हती. पतीचे घर सोडल्‍यानंतर तीन वर्षांनी तिला एका आश्रमाशाळेत नोकरी मिळाली. त्‍यामुळे तिने नोकरी करायची इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी पतीचे घर सोडले होते, असे म्‍हणणे चुकीचे ठरते. उलट पती सातत्‍याने चारित्र्यावर संशय असल्याने घर सोडल्‍याचा पत्‍नीचा दावा अधिक ग्राह्य वाटतो, असेही निरीक्षणही खंडपीठाने व्‍यक्‍त केले.

पत्नीने त्याग करणे सिद्ध केले नाही, हा पतीचा दावा ती काही वर्ष वेगळी राहिली होती म्हणून सिद्‍ध करता येत नाही. हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13 अन्वये नमूद केलेल्या कारणाशिवाय, एका पक्षकाराने केलेल्या वादावर विवाह रद्‍द ठरवला  जाऊ शकतनाही. कायद्यानुसार होणारे विवाह इतर कोणत्याही कारणास्तव विसर्जित केले जाऊ शकत नाहीत, असे स्‍पष्‍ट करत खंडपीठाने पतीने केलेल्‍या घटस्‍फाेटाची मागणी फेटाळून लावली.

 

Back to top button