महाद्वार रोड नवरात्रौत्सवात वाहतुकीस खुला; गर्दी वाढल्यास काही काळ वाहतूक बंद | पुढारी

महाद्वार रोड नवरात्रौत्सवात वाहतुकीस खुला; गर्दी वाढल्यास काही काळ वाहतूक बंद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  नवरात्र काळात शिवाजी चौक, महाद्वार रोड, गुजरी हे मार्ग दुचाकी वाहतुकीसाठी पूर्णपणे खुले राहणार आहेत. गर्दी वाढल्यास काही काळ हे मार्ग बंद ठेवण्यात येतील, असे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. शैलेश बलकवडे यांनी सांगितले. महाद्वार रोड व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत ते बोलत होते. अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला पोलिस बंदोबस्त देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवरात्र व दिवाळी काळात महाद्वार रोड, गुजरी मार्ग वाहतुकीसाठी खुले ठेवावेत, अशी मागणी व्यापारी असोसिएशनने केली होती. या अनुषंगाने डॉ. शैलेश बलकवडे यांनी या मार्गांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी महाद्वार रोड व्यापारी व सराफ असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी सराफ असोसिएशनच्या सभागृहात चर्चा केली.

कोरोना काळात व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता शासनानेही सगळे निर्बंध उठवले आहेत. जिल्हा प्रशासनाने गेल्यावर्षीप्रमाणे बॅरिकेडस् लावून रस्ते बंद न करता वाहतुकीला खुले ठेवावेत, अशी मागणी किरण नकाते यांनी केली.
महाद्वार रोडवरील अतिक्रमणांवर नियंत्रण आणावे व उत्सव काळात वाहतूक ठप्प होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे अजित ठाणेकर यांनी सांगितले. कुलदीप गायकवाड यांनी जोतिबा रोड कोपर्‍यावरील रस्त्यावर फूलवाले आले आहेत. तेथील रिक्षास्टॉपला परवानगी नाही. त्यामुळे होणार्‍या वाहतुकीच्या कोंडीबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.

शिवाजी चौकातील बॅरिकेडिंग काढणार

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून निर्बंध होते. हे निर्बंध उठवण्याचा जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाने काही अटींवर निर्णय घेतला आहे. याप्रमाणे शिवाजी चौकातील बॅरिकेडिंग काढून टाकून हा रस्ता दुचाकींसाठी सुरू राहणार आहे. भाविकांच्या रांगा भवानी मंडप कमानीपासून सुरू होतील. या रांगा कमानीच्या बाहेर भाऊसिंगजी रोडवर आल्यास तात्पुरती या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येईल. गर्दी कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे डॉ. शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

चारचाकी वाहने बंदच

यंदा भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दर्शनानंतर अनेक भाविक मंदिर परिसरात खरेदीला जातात. त्यामुळे गर्दी वाढते. म्हणून उत्सव काळात महाद्वार रोडवर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. ज्या व्यापार्‍यांना दुकानात माल आणायचा आहे त्यांनी रात्री दहानंतरच याचे नियोजन करावे. या मार्गावर ज्या व्यापार्‍यांची दुकाने आहेत त्यांनीही चारचाकी वाहनांचा वापर टाळावा, असे आवाहन डॉ. बलकवडे यांनी केले.

नियम पाळा, कारवाई टाळा

उत्सव काळात व्यापार्‍यांच्या मागणीनुसार नियमावली तयार करण्यात येत आहे. त्याचे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यापार्‍याची आहे. रस्त्यावर उभे राहून वाहतुकीला अडथळा होईल, अशी मालाची विक्री करू नये, असे आवाहन डॉ. बलकवडे यांनी केले. तसेच महाद्वार रोडवरही एक दिवस आड वाहनांचे पार्किंग करण्याचा प्रयोग केला जाणार असल्याचे ते म्हणाले.

रिक्षा व बसस्टॉपची स्वतंत्र व्यवस्था

उत्सव काळात रिक्षांना मंदिर परिसराच्या ठराविक अंतरापर्यंत परवानगी दिली जाणार आहे. तेथेच त्यांनी स्टॉप करावेत. केएमटीसाठीही स्वतंत्र नियोजन वाहतूक शाखेमार्फत केले जाणार आहे. खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे.
या बैठकीला शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष राजेश राठोड, जयंत गोयानी, प्रीतम ओसवाल, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, विजय हावळ व व्यापारी उपस्थित होते.

 

 

Back to top button