औरंगाबाद : पती जेलमध्ये; पत्नी बनली गांजा तस्कर | पुढारी

औरंगाबाद : पती जेलमध्ये; पत्नी बनली गांजा तस्कर

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : गांजाविक्रीच्या गुन्ह्यात पती जेलमध्ये गेल्यानंतर पत्नीने गांजाविक्री सुरू केली. आता एनडीपीएस पथकाने तिलाही पकडले असून तिच्याकडून 5 किलो 521 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई 5 सप्टेंबरला करण्यात आली.

रंजना सचिनकुमार पांडे (48, रा. रामेश्वरनगर, मयूरपार्क रोड, हर्सुल) असे पकडलेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पतीही गांजा तस्करीच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे, असे एनडीपीएस पथकातील पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले, की एनडीपीएस पथक शहरात गस्त घालत होते. त्यांना रामेश्वरनगर येथे एक महिला गांजाविक्री करत असल्याची माहिती मिळाली.

पथकाने ही बाब वरिष्ठांना कळवली. त्यानंतर उपायुक्त अपर्णा गिते यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यावर सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे, सहायक फौजदार नसीम खान शब्बीर खान, अंमलदार महेश उगले, सुरेश भिसे, धर्मराज गायकवाड, महिला अंमलदार प्राजक्ता वाघमारे, चालक डी. एस. दुभळकर यांच्या पथकाने छापा मारला. तेथे महिला गोणपाटाची पिशवी घेऊन जाताना दिसली. पथकाने तिची विचारपूस केल्यावर ती रंजना पांडे असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या पिशवीत गांजाने भरलेल्या 38 पुड्या आढळून आल्या. अधिक विचारपूस केल्यावर तिने घरातच जिन्याखाली गांजाचा साठा करून ठेवल्याचे समजले. पथकाने एकूण 5 किलो 521 ग्रॅम गांजा जप्त केला. तिच्याविरुद्ध हर्सूल ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रंजना पांडे हिला न् यायालयात हजर करण् यात आले असता, सहायक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपी रंजनाने गांजा कोठून व कोणाकडून आणला, तसेच कोणाला विक्री करणार होती. आरोपीने आणखी कोठे गांजाचा साठा करुन ठेवला आहे काय, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास बाकी असल्याने आरोपी रंजनाला पोलिस कोठडी देण् याची विनंती न् यायालयाकडे केली. न्यायालयाने आठ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पती रेकॉर्डवरील आरोपी

रंजना पांडे हिचा पती सचिनकुमार हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. तोदेखील गांजा तस्कर आहे. गांजा विक्रीच्या गुन्ह्यातच काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो हर्सूल जेलमध्ये आहे, अशी माहिती एनडीपीएस पथकातील पोलिसांनी दिली.

नारेगावातही बस्तान

गांजा तस्कर रंजना पांडे हिचे एक घर मयूरपार्क भागात तर दुसरे घर नारेगावातील बलुची गल्ली येथे आहे. तिच्या अटकेची माहिती मिळताच बलुची गल्ली भागातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले. पोलिस तिच्याकडे हा गांजा कोठून येतो, कोण आणून देते? याबाबची चौकशी करीत होते. मात्र, तिने तोंड उघडले नव्हते.

Back to top button