राज ठाकरे म्हणाले, मंदिरे उघडण्यासाठी मनसे आंदोलन करणार | पुढारी

राज ठाकरे म्हणाले, मंदिरे उघडण्यासाठी मनसे आंदोलन करणार

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मंदिरे उघडली गेलीच पाहिजेत.अन्यथा सर्व मंदिरांच्या बाहेर घंटानाद करू, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी दिला.

एक-दोन दिवस जाऊ द्या. नंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. त्यात आम्ही याबाबत चर्चा करू, असे सांगून राज म्हणाले, लॉकडाऊन आवडे सरकारला, पण इतर सर्व गोष्टी कशा सुरू आहेत. दुकाने, मॉल उघडली गेली, क्रिकेट, फुटबॉल आदी खेळ खेळले जात आहेत. भाजपची जनआशीर्वाद यात्रा झाली. राणेंच्या विरोधात यांच्या हाणामार्‍या झाल्या, तेव्हा काही निर्बंध नाही. हे सर्व यांना चालते.

भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक घातला. यांच्यासाठी मंदिरे सुरू आणि बाकीच्यांनी मंदिरात जायचे नाही. बाकीच्या सगळ्यांचे सभा, मेळावे सुरूच आहेत, पण आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी बळकावलेल्या महापौर बंगल्याबाहेर कामे करून घेण्यासाठी येणार्‍या बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या नाहीत.

हजारो कोटींची कामे यांनी वाजवली आणि आता कोणी मोर्चे काढू नयेत म्हणून तिसर्‍या लाटेचा घाट घातला जात आहे, असा आरोप राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या केला.

जास्त थर रचू नका, असे सरकारकडून सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभे राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी स्पष्ट केले.

अण्णा हजारे इतके दिवस होते कुठे?

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंदिरे उघडण्याच्या विरोधकांच्या मागणीला पाठिंबा देत मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे. त्याबाबत राज यांना विचारले असता, अण्णा इतके दिवस होते कुठे? असा थेट सवाल त्यांनी केला. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त यांच्यावर फेरीवाल्याने सोमवारी जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. महिला अधिकार्‍यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांकडून जेव्हा सुटेल तेव्हा आमच्याकडून मार खाणार, असेही ते म्हणाले.

आम्ही त्याला शोधून चोपणार : अविनाश जाधव

कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेला हल्ला परप्रांतीय म्हणून नाहीतर त्याने महिलेवर हात उचलला आहे. त्यामुळे मनसेच्या रोषाला त्याला सामोरे जावे लागेलच, त्याचबरोबर त्या फेरीवाल्याला शोधून मिळेल तेथे चोप दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.

Back to top button