विमानतळ विकासासाठी २० हजार कोटी | पुढारी

विमानतळ विकासासाठी २० हजार कोटी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवाई प्राधिकरणाने देशातल्या विमानतळ यावरील येत्या चार ते पाच वर्षांत विस्तारीकरण आणि विकास करण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यातील हवाई वाहतूक क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी स्वतः लक्ष देण्याची आणि आवश्यक तिथे हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. या विमानतळांमध्ये कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद, अकोला, गोंदिया, अमरावती आदींचा समावेश आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात, सिंधिया यांनी महाराष्ट्रातील हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडित विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर परिणाम करणार्‍या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे.

अकोला विमानतळावरील धावपट्टी आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 234.21 एकर जागेची गरज असल्याचा अंदाज भारतीय हवाई प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. यापैकी केवळ 149.95 एकर जागा आतापर्यंत, एएआयकडे सुपूर्द करण्यात आली आहे. उर्वरित 84.26 एकर जागा अद्याप एएआयला मिळालेली नाही.

प्रादेशिक हवाई संपर्क निधी न्यास मधील राज्यांचा वीजीएफचा वाटा म्हणून, 12.02 कोटी रुपये निधी राज्याकडे प्रलंबित असून, तो देण्यात यावा,असे सांगण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय उडान विमानतळ कार्यान्वयन अंतर्गत पुणे-दुबई, पुणे-बँकॉक, पुणे-माले, पुणे-सिंगापूर, पुणे-काठमांडू,पुणे-क्वालालंपूर या मार्गांवर हवाई सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने आपला 100 टक्के वीजीएफ वाटा देण्यासाठी मंजुरी द्यावी. ही मंजुरी मिळाल्यावर हे मार्ग हवाई कंपन्यांसाठी लिलावात खुले केले जातील,असे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे

* औरंगाबाद विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी आणि त्याला समांतर असा टॅक्सी ट्रॅक तयार करण्यासाठी 182 एकर जमिनीची गरज आहे, तरच, हे विमानतळ कोड ‘ई’ प्रकारातील विमानांसाठी सुयोग्य ठरू शकेल.

* गोंदिया विमानतळालगतच्या गावातील रस्त्याला वळण मार्ग उभारणे आणि शहराच्या बाजूच्या विकासकामांसाठी 47.60 एकर जमिनीची गरज आहे.

* अमरावती आणि रत्नागिरी विमानतळाच्या विकासासाठी 95 कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या विमानतळांवरून आरसीएस-उडान अंतर्गत कार्यान्वयन शक्य व्हावे, या दृष्टीने त्यांचा विकास करणे गरजेचे आहे.

* कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या विकासासाठी आणि विमानतळांवर विशिष्ट प्रकारच्या विमानांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी, अप्रोच लाईट लावण्यास, 64 एकर जागेची गरज आहे.

* सोलापूर येथील चिमणी काढण्याचे काम लवकरात लवकर हाती घ्यायला हवे, जेणेकरून सोलापूर विमानतळदेखील आरसीएस-उडानशी जोडले जाऊ शकेल.

Back to top button