सोलापूर : आश्र्लेषा नक्षत्राच्या तुफान पावसाने उडवली दैना; शेती-पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

सोलापूर : आश्र्लेषा नक्षत्राच्या तुफान पावसाने उडवली दैना; शेती-पिकांचे मोठे नुकसान

पुढारी ऑनलाईन डेस्क : आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे, घोळसगाव, किणीवाडी, काझी कणबस बादोले आदी गावात पावसाने थैमान घालत शेतीपिकाचे मोठे नुकसान केले. बुधवारी (दि.३ ऑगस्ट) दुपारी दीडच्या सुमारास तीन तासाच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले. पावसाचा रौद्ररूप पाहायला मिळाला यामुळे गावातील घराघरात पाणी घुसले आहे. या पावसामुळे परिसरातील घोळसगाव येथील तलाव १०० टक्के भरुन वाहत आहे.

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव घोळसगाव बादोले वागदरी शिरवळ सापळे आदी भागात बुधवारी दुपारी दोन वाजता आश्लेषा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत होते. गेल्या आठ दिवसापासून हवामानामध्ये कमालीची घट झाली असून आर्द्रते बरोबरच उष्णतेच्या झळा सुद्धा सोसाव्या लागत होत्या. बुधवारी दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पडलेल्या तुफान पावसामुळे ऊस, मुग, उडीद सोयाबीन, तूर आदी पिके ज्यादा पावसामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहेत.

समाधानकारक पावसामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. वर्षभर पुरेल इतके पाणी या भागातील जलस्त्रोतात उपलब्ध झाले आहे. काही भागात उभे असलेले उसाचे पीक आडवे पडले असून काही भागात मोठे नुकसान झाले आहे. बोरगाव नजीक असलेल्या पुलावर भरपूर पाणी वाहत असल्याने दुपार पासून घोळसगाव व वागदरीकडे जाणाऱ्या लोकांचा मार्ग बंद पडला होता. त्यामुळे गावचा संपर्क तुटला होता.

यंदाच्या हंगामातील सगळ्यात मोठा पाऊस पडला आहे. अडीच तास पडलेल्या पावसाने रौद्ररूप धारण केले होते. काही क्षणातच संपूर्ण भाग जलमय झाला. अनेक गावांचा संपर्क तुटला. बोरगाव गावातून खूप मोठ्या पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button