दोन महिन्यांनंतरही ओढे, नाले कोरडेच; पंढरपूर तालुक्यात पावसाची हुलकावणी | पुढारी

दोन महिन्यांनंतरही ओढे, नाले कोरडेच; पंढरपूर तालुक्यात पावसाची हुलकावणी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : श्रावण महिना सुरु झला तरी पंढरपूर तालूक्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अद्यापही विहिरींनी तळ गाठलेलेच आहेत. तर ओढे, नाले देखील कोरडेच पडलेले आहेत. दमदार पाऊस झालेला नसताना देखील पाऊस पडेल या आशेवर शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील 90 टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. पेरणी केलेल्या पिकांची उगवण चांगली झाली असली तरी त्याला पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

पावसाळ्याचे सुरुवातीचे दोन महिने निघून गेले. पाऊस आला आला अन् गेला गेला, असे चित्र दिसून येत होते. सद्यादेखील श्रावण महिना सुरु झाला तरी पावसाचा पत्ता नाही. मात्र, श्रावण महिन्यात पाऊस पडेल, अशी शेतकर्‍यांना आशा आहे. मागील वर्षाचा अनुभव पाहता शेतकर्‍यांनी मोठ्या धाडसाने खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. याकरीता महागडे बी-बियाणे, खते, औषधे यावर शेतकर्‍यांनी मोठा खर्च केला आहे. परंतु पाऊस लांबू लागला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.आठवडाभरात पाऊस पडला तरच पेरणी केलेली मका, तूर, उडिद, सुर्यफूल आदी पिके वाचू शकतात; अन्यथा शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात या दिवसात पावसाच्या पाण्याने ओढे, नाले भरून वाहत असतात. मात्र, यंदा पाऊस लांबला आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने शेतकर्‍यांची निराशा केली आहे. त्यामुळे ओढे, नाले कोरडे पडलेले आहेत, तर विहिरींनी देखील तळ गाठलेला आहे. तर माळरानावरील विहिरी अद्यापही कोरड्या ठाक पहलेल्या आहेत. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांच्या विहिरीत पाणी नाही, अशा शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या अद्याप केलेल्या नाहीत.

पाऊस आलाच तर हलका ते मध्यम स्वरुपाचा येतो. या पावसामुळे जमिनीत ओल तयार होत नाही. या उलट रिमझिम पावसामुळे शेतात गवत, तन जास्त वाढत चालले आहे. यामुळे शेतकर्‍यांना सातत्याने जमिनीची मशागत करावी लागत आहे, तर पेरणी केलेल्या पिकांमध्ये तणनाशकाची फवारणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

कॅनॉलच्या पाण्याचाच एकमेव आधार

पाउस समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे विहीरी अद्यापही कोरड्या पडलेल्या आहेत. तर बोअरवेलचे पाणी फळबागांना द्यावे लागत आहे. यामुळे खरीपाची पेरणी केलेल्या पिकांना एकतर पावसावर अवंबून रहावे लागणार आहे. पाऊस लांबला तर निरा उजवा कालवा, उजनी डावा व उजवा कालव्यास येणार्‍या आवर्तनाचाच शेतकर्‍यांना आधार मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून निरा उजवा , उजनी कालवा विभागाकडे पाणी मागणी अर्ज करु लागले आहेत.

Back to top button