सोलापूर : आश्रमशाळाही झाल्या डिजिटल | पुढारी

सोलापूर : आश्रमशाळाही झाल्या डिजिटल

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा समाजातील वंचित घटकांनाही आता आधुनिक यंत्रणेद्वारे शिक्षण घेता यावे तसेच त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाव्यात यासाठी आश्रमशाळांतही आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यासाठी आश्रमशाळांतही डिजिटल क्लासरुम बनविण्यात येत आहे. त्यामुळे नामांकित शाळांप्रमाणेच आता आश्रमशाळांतही दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सोलापूरच्या समाजकल्याण कार्यालयामार्फत चालविण्यात येणार्‍या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी दोन शाळा आता डिजिटल क्लासरूम झाल्या आहेत. हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, नजिकपिंपरी (ता. मोहोळ) आणि अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, अक्कलकोट या दोन्ही शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरू करण्यात आले आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात शाळांमध्येही बदल होऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या टॅबचा वापर करुन उपक्रम तयार केले आहेत. या प्रकल्पामुळे शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली असून शिक्षणाची आवडही निर्माण झाली आहे.

डिजिटलबरोबर वाय-फायसुद्धा

जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत सामाजिक न्याय विभागाची 9 वसतिगृहे, दोन निवासी शाळांत डिजिटलबरोबर वाय-फायसुद्धा देण्यात आले आहे. सात रस्ता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील सामाजिक न्याय विभागाचे संपूर्ण कार्यालय वाय-फाय करण्यात आले. महाराष्ट्रातील हा पहिला पायलेट प्रोजेक्ट ठरणार आहे.

कोरोनात ऑनलाईन शिक्षणामुळे अँड्रॉईड मोबाईल व इतर नेटपॅकवर मोठा खर्च होतो. उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना हा खर्च परवडणारा नाही. वसतिगृहांत असणारी मुले ही गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील असतात. या वाय-फाय सुविधेमुळे त्यांच्या अभ्यासाला गती मिळणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धांमध्ये टिकून राहण्यास अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
– कैलास आढे
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण

Back to top button