‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी मनपा कर्मचार्‍यांना ध्वज घेण्याची सक्‍ती | पुढारी

‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी मनपा कर्मचार्‍यांना ध्वज घेण्याची सक्‍ती

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सुमारे पाच हजार कर्मचार्‍यांना केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत ध्वज घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. ध्वजाची रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल केली जाणार आहे. महापालिकेकडून सध्या या उपक्रमासाठी मोठी लगबग सुरू आहे. शहरातील सुमारे पावणदोन लाख घरांवर ध्वज लावण्याचा महापालिकेचा संकल्प आहे.

यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी व्यापारी-उद्योजकांची मदत घेतली आहे. शासनाने सर्वात कमी 30 बाय 20 से.मी. आकाराचा ध्वज 30 रुपयांना उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. चेंबर ऑफ कॉमर्सने बचत गटांना ध्वज तयार करण्याचे काम देऊन या दराहून कमी म्हणजे 20 रुपयांना हे ध्वज लोकांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

या अनुषंगाने बुधवारी महापालिका आयुक्तांनी घेतलेेल्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी चेंबरचे अध्यक्ष राजू राठी, अन्य पदाधिकारी व बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, मनपाच्या सर्व कर्मचार्‍यांना ध्वज विकत घेण्याची सक्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. कर्मचार्‍यांना ध्वज देऊन रकमेची वसुली त्यांच्या वेतनातून करण्यात येणार आहे, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

व्यापारी लावणार स्टॉल

शहरात अनेक ठिकाणी व्यापारी संघटनांच्या माध्यमातून ध्वज विक्री करण्याचे स्टॉल्स लावण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विक्री व्हावी याकरिता मनपा तसेच व्यापार्‍यांतर्फे प्रबोधन करण्यात येणार आहे. शहरातील शालेय विद्यार्थ्यांनादेखील मनपाच्या माध्यमातून ध्वज विक्री करण्यात येणार आहे.

मनपावरील ‘त्या’ झेंड्याबाबत लवकरच निर्णय

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महापालिकेच्या मुख्यालयावर मोठा ध्वज लावण्यात येणार आहे. बाजारात 100 फुटांचे ध्वज उपलब्ध आहेत. ते सहज प्राप्त होऊ शकतात, मात्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव लक्षात घेता 75 फुटांचा ध्वज लावायचे झाल्यास तशी ऑर्डर देऊन ध्वज बनवून घ्यावा लागणार आहे. या कामास विलंब लागू शकतो. त्यामुळे 100 वा 75 फुटांचा ध्वज लावायचा, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

Back to top button