बुद्धिप्रामाण्यवादी छत्रपती संभाजी महाराज

बुद्धिप्रामाण्यवादी छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजीराजे हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. शेवटच्या क्षणापर्यंत रयतेच्या स्वराज्यासाठी ते लढत होते. अर्ध्या आशिया खंडावर सत्ता असणार्‍या औरंगजेब बादशहाला सह्याद्रीमध्ये जखडून ठेवण्याचे आणि त्याला हतबल करण्याचे महान कार्य संभाजीराजांनी केले. त्यांनी प्राणाचे बलिदान दिले, परंतु शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य मोगलांच्या स्वाधीन केले नाही. संभाजीराजांच्या त्यागाला, समर्पणाला, शौर्याला, विद्वत्तेला, निष्ठेला जगाच्या इतिहासात तोड नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे निष्ठेने, निर्भीडपणे आणि तळमळीने संवर्धन आणि रक्षण करण्याचे महान कार्य छत्रपती संभाजीराजांनी केले. शिवरायांच्या मृत्यूसमयी शंभूराजे अवघे 23 वर्षांचे होते. औरंगजेब सुमारे सहा लाखांची फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला. विजापूरचा आदिलशहा, जंजिर्‍याचा सिद्दी, गोवेकर पोर्तुगीज, मुंबईकर इंग्रज आणि अंतर्गत सनातनी मंत्री या सर्वांनी संभाजीराजांना घेरले; परंतु या सर्वांविरुद्ध अखंड नऊ वर्षे ते निकराने लढले. त्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडले. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठा त्वेषाने लढत होते.

संभाजीराजे निद्रेचे चार तास सोडले तर सतत 20 तास मोगल, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी आणि सनातन्यांविरुद्ध लढत होते. बर्‍हाणपुरापासून सोलापूरपर्यंत संभाजीराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले, तेव्हा मोगलांचा दरबारी इतिहासकार खाफीखान म्हणतो, 'शिवाजीराजे आम्हा मोगलांना जेवढे तापदायक होत, त्यांच्यापेक्षा संभाजीराजे मोगलांसाठी दहापटीने तापदायक आहेत.' खाफीखानाने केलेल्या वर्णनावरून संभाजीराजांच्या शौर्याची, धैर्याची कल्पना येते. संकटसमयी संभाजीराजे लढणारे होते, रडणारे नव्हते. एकाच वेळेस अनेक आघाड्यांवर ते लढत होते. हंबीरराव मोहितेंसारखे पराक्रमी, प्रामाणिक आणि स्वराज्यनिष्ठ सरसेनापती त्यांना लाभले होते.

संभाजीराजांना ऐन तारुण्यात प्रत्यक्ष पाहणारा फ्रेंच पर्यटक अ‍ॅबे करे लिहितो, 'संभाजीसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात अन्यत्र पाहिला नाही.' अ‍ॅबे करे हा समकालीन आहे. तो पर्यटक होता. तो तटस्थ होता. त्यामुळे त्याने केलेले संभाजीराजांचे वर्णन अचूक असेच आहे. उत्तरकालीन बखरकार, कादंबरीकार, नाटककारांनी केलेल्या प्रतिमाहननाला ऐततिहासिक आधार नाही. समकालीन संभाजीराजांच्या शौर्याचे, पराक्रमाचे, त्यागाचे, निर्भीडपणाचे, स्वराज्यनिष्ठेचे, पांडित्याचे आणि सौंदर्याचे मुक्तकंठाने कौतुक करतात.

'संभाजीराजे प्रजावत्सल होते. त्यांनी प्रजेवर जिवापाड प्रेम केले. त्यांनी वयोवृद्ध आणि समवयस्क सैनिकांना अत्यंत मायेने, ममतेने आणि आदराने वागविले,' असे अ‍ॅबे करे सांगतो. समकालीन इटालीयन पर्यटक निकोलाओ मनुची संभाजीराजांच्या धाडसाचे, स्वाभिमानाचे आणि राजशिष्टाचाराचे वर्णन त्याच्या प्रवासवर्णनात करतो. ऐन कुमारवयात संभाजीराजांवर स्वराज्य रक्षणाची जबाबदारी पडली. ती मोठ्या ताकदीने त्यांनी पेलली. एका बाजूला ते स्वराज्य रक्षणासाठी लढत होते, तर दुसर्‍या बाजूला ते स्वराज्यातील जनतेला न्याय देत होते. प्रजेला आधार देत होते.

महिलांना संंरक्षण देत होते. शेतकर्‍यांना दिलासा देत होते. संभाजीराजे हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. ते म्हणतात, 'जे प्रयत्नवादी असतात, ते पुरुष सिंह असतात. ज्यांचा नशिबावर विश्वास असतो, त्यांना का पुरुष म्हणतात! यश मिळविण्यासाठी पूजापाठ नव्हे, तर प्रयत्नवादी असले पाहिजे,' असे त्यांचे मत होते. त्यांनी महिलांचा आदर सन्मान केला. आपल्या आजी जिजाऊंचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. मातोश्री सोयराबाईंचा आदर-सन्मान केला. त्यांना अत्यंत आदराने वागविले. त्यांचा अवमान होणार नाही, याची त्यांनी दक्षता घेतली. महाराणी येसूबाई यांना सर्वाधिकार दिले. 'श्री सखी राज्ञी' हा बहुमान त्यांना दिला. बंधू राजारामला अत्यंत प्रेमाने वागविले. राजारामचे लग्न लावून दिले. भावजय ताराराणी यांना सर्वाधिकार दिले. संभाजीराजे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.

शिवाजीराजे-संभाजीराजे यांच्यात कोणत्याही स्वरूपाचे भेदभाव नव्हते. शिवरायांना शंभूराजांबद्दल प्रचंड अभिमान होता. बालपणापासूनच शंभूराजांना स्वराज्यनिर्मितीचे धडे शिवरायांनी दिले. शिवरायांनी त्यांना दहा हजार सैन्य घेऊन गुजरात मोहिमेवर पाठविले, तेव्हा संभाजीराजे केवळ 15 वर्षांचे होते, असे वर्णन अ‍ॅबे करेने केलेले आहे. शिवाजीराजांनी त्यांना आग्य्राला नेले. कोकण, पन्हाळा, औरंगाबाद येथील जबाबदारी सोपवलेली होती. शिवरायांना संभाजीराजांच्या कार्याचा मोठा अभिमान होता. पन्हाळा मुक्कामी शिवाजीराजे जेव्हा संभाजीराजांना म्हणाले की, 'दक्षिणेकडील राज्य तुम्हाला आणि उत्तरेकडील राजारामाला' तेव्हा संभाजीराजे शिवरायांना म्हणाले, 'दूधभात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन; परंतु राज्याची वाटणी नको.' यावरून स्पष्ट होते की, संभाजीराजे सत्ताभिलाषी नव्हते, तर ते शिवनिष्ठ, स्वराज्यनिष्ठ, नि:स्वार्थी होते.

संभाजीराजे जसे तलवार चालवणारे शूर वीर होते, तसेच लेखणी चालविणारे संस्कृत विद्वान होते. शिवरायांनी दक्षिण भारत जिंकला. औरंगजेबाला दक्षिणेत गुंतवून उत्तर भारत जिंकण्याची संभाजीराजांची महत्त्वाकांक्षा होती. यासाठी औरंगजेबपुत्र शहाजादा अकबराची संभाजीराजांना साथ होती. संभाजीराजांच्या पराक्रमाचे, विद्वत्तेचे वर्णन इंग्रजांनीदेखील केलेले आहे. मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांना पराभूत करण्याचा प्रयत्न संभाजीराजांनी केला. जंजिरा द़ृष्टिक्षेपात आला आणि औरंगजेब महाराष्ट्रात उतरला; पण संभाजीराजे शेवटच्या क्षणापर्यंत रयतेच्या स्वराज्यासाठी लढत होते. अर्ध्या आशिया खंडावर सत्ता असणार्‍या औरंगजेब बादशहाला सह्याद्रीमध्ये जखडून ठेवण्याचे आणि त्याला हतबल करण्याचे महान कार्य संभाजीराजांनी केले. संभाजीराजांनी प्राणाचे बलिदान दिले; परंतु शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य मोगलांच्या स्वाधीन केले नाही. संभाजीराजांच्या त्यागाला, समर्पणाला, शौर्याला, विद्वत्तेला, निष्ठेला जगाच्या इतिहासात तोड नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news