सोलापूर : 34 सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबल्या | पुढारी

सोलापूर : 34 सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबल्या

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील 34 सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या दिनांक 13 जुलै 2022 रोजीच्या अहवालानुसार राज्यातील 89 व्यक्ती व 181 प्राणी यांचा मृत्यू झाला असून, राज्यातील अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेली 249 गावे तर, एकंदरीत 1368 घरांची पडझड झालेली आहे.

यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यासह अनेक जिल्ह्यात एन. डी. आर. एफ. ची पथके तैनात करण्यात आली असून, राज्यातील सर्व धरणे पूर्णपणे भरलेली असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सहकारी संस्थाच्या निवडणुका सुरू झाल्या होत्या. तर काही संस्थाच्या निवडणुका सुरू होणार होत्या. जिल्ह्यातील पुढे ढकलण्यात आलेल्या संस्थामध्ये ब वर्गातील 12, क वर्गातील 22 अशा 34 सहकारी संस्थाच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत. तर 1 सहकारी संस्थेचा कार्यक्रम सुरू होणार होता. परंतु शासनाच्या आदेशाने आता या निवडणुका पुढे अतिवृष्टी कमी झाल्यानंतर सुरू होणार असल्याचेही भोळे यांनी सांगितले.

Back to top button