अक्कलकोट :सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी 5 कोटी निधी | पुढारी

अक्कलकोट :सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी 5 कोटी निधी

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा येथील सदोष वितरण प्रणालीचा फटका बसून नेहमी होणारा अनियमित आणि अपुर्‍या पाणीपुरवठा प्रश्न आता कायमचा मार्गी लागणार आहे.पाणी पुरवठ्यातील सर्व वितरण व्यवस्थेतील दोष दूर करण्याच्या कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने पाच कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने नवीन सरकारकडून पाच कोटींची भेट ही नवीन पाणीपुरवठा कामासाठी असून आता शहरातील नागरिक आणि स्वामीभक्तांना यापुढे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.अक्कलकोट शहरासाठी यापूर्वी वाढीव लोकसंख्या व स्वामीभक्तांचा विचार करून सुधारित पाणीपुरवठा यंत्रणा नसल्याने आठ दिवसांतून एकदा तसेच अपुरा पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता.

आता या नव्या सुधारित योजनेने अडचणी दूर होऊन एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.सदर काम लवकरच पूर्ण होणार असल्याने नागरिकांची पाण्याची मूलभूत गरजही पूर्ण होणार आहे.सदर कामाचा तपशील पुढीलप्रमाणे असणार आहे.ज्यात पाणी पुरवठा योजना येथे एक्सप्रेस फिडरलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्र येथे 20 लाख लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी बांधणे, फिल्टर बेडची क्षमता वाढविणे, नवीन फाईटेन बांधणे, नवीन पंप हाऊस बांधणे, अनुषंगिक पंपिंग मशिनरी बसविणे. जलशुद्धीकरण केंद्र ते ज्या भागात वितरण व्यवस्थेत आजपर्यंत अडचणी येत आहेत, त्याठिकाणची वितरण व्यवस्था बदलून पुरेशा रितीने पाणीपुरवठा होईल, अशा पद्धतीने पाईपलाईन करणे व आवश्यकतेनुसार शहरात ठिकठिकाणी वितरण नलिका टाकणे आदी कामे अपेक्षित आहेत.

स्वामीभक्तांची होणार सोय

नगरपरिषद क्षेत्रात नागरी सेवा व सुविधेची कामे (3604/ 1018) या योजने अंतर्गत अक्कलकोट नगरपरिषद पाणीपुरवठा कामांसाठी रक्कम रुपये पाच कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्प खर्चाचा शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे त्यामुळे ही योजना नजीकच्या काळात पूर्ण होऊन शहरवासीय व स्वामीभक्तांची यांची कायमची गैरसोय संपणार असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अक्कलकोटकरांच्या वतीने आभार व्यक्त करीत आहे. तसेच या कामासाठी आवश्यकता भासल्यास आणखी निधी देण्याचे दोघांनीही मान्य केल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केलेे.

Back to top button