कारागृहातून सुटताच दुचाकी चोरी | पुढारी

कारागृहातून सुटताच दुचाकी चोरी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : हर्सूल कारागृहातून सुटताच महिन्याभरातच दोन सराईत चोरट्यांनी विविध ठिकांणाहून तीन दुचाकी पळवल्या होत्या. तपासादरम्यान वेदांतनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारागृहातून बाहेर पडलेल्या दोघांना बेड्या ठोकल्या. शोएब कुरेशी (रा. चिकलठाणा) आणि सचिन मिसाळ (रा. रांजणगाव शेणपुंजी) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. वेदांतनगर ठाण्यात नामदेव वामराव आढागळेयांनी 17 जूनला दुचाकी (एमएच-20-सीजी-9526) घरासमोरुन चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिन्याभरापूर्वी हर्सूल कारागृहातून सुटून आलेला आरोपी शोएब कुरेशी हा दुचाकी घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी शोएबला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदार सचिन मिसाळ सोबत तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

या तिन्ही दुचाकी या दोघांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील एक दुचाकी (एमएच-21-बीके-4340) जालना येथून चोरी केल्याचे उघड झाले. दोन अट्टल दुचाकीचोर पोलिसांच्या जाळ्यात शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरी करणार्‍या दोघांना तीन दुचाकीसह गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. सागर संतोष केदारे (रा. साजापूर) आणि शेख इस्माईल शेख युसूफ (रा. रेंगटीपुरा) अशी अटकेतील सराईत दुचाकीचोरांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अजित दगडखैर यांच्या पथकाला साजापूर येथे सागर केदारे हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. 1 जुलै रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने केदारे यास ताब्यात घेतले. त्याच्या
ताब्यातील दोन दुचाकी साजापूर येथूनच पोलिसांनी हस्तगत केल्या. दरम्यान, शेख इस्माईल याने घाटी रुग्णालय येथून दुचाकी चोरी केल्याची माहिती मिळताच त्याला भवानीनगर, निझामगंज कॉलनी येथून दुचाकीसह गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

Back to top button