अक्कलकोट : एस.टी.चालक, वाहकांसाठी ‘अन्नछत्र’ सज्ज | पुढारी

अक्कलकोट : एस.टी.चालक, वाहकांसाठी ‘अन्नछत्र’ सज्ज

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नाव देशातच नव्हे तर परदेशातही पोहोचलेले आहे. देशभरातून मोठ्या प्रमाणात एसटीने भाविक अक्कलकोटला येतात. गुरुपौर्णिमा व अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त अन्नछत्र मंडळाच्या वतीने रा.प. महामंडळाच्या चालक-वाहकांसाठी विश्रांती गृह व जड वाहनासाठी वाहनतळ विकसित करण्यात आली आहे. त्या ठिकाणी महामंडळाच्या कर्मचार्‍यांची सोय करण्यात आली आहे.

मंडळाच्या जडणघडणीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे मोठे योगदाना असल्याचे संस्थापक जन्मेजयराजे भोसले यांनी सांगितले. दररोज राज्यासह परराज्यातील शंभराहून अधिक बसेसच्या चालक-वाहकांचा मुक्काम असतो, रोज येणार्‍या रा.प.म.च्या बसेस बरोबरच गुरुपोर्णिमेच्या औचित्याने येणार्‍या जादा बसेसच्या चालक-वाहकासाठी मंडळ सज्ज आहे. दरम्यान, अन्नछत्र मंडळ या न्यासाच्या गट 581 येथे रा.प.म. बसेस व जडवाहनाचे प्रशस्त वाहन तळ व आणि भव्य अशा चालक-वाहक विश्रांती गृहाच्या शुभारंभ 27 डिसेंबर 2018 रोजी करण्यात आला. कोव्हिड 19 मुळे दोन वर्षे चालक-वाहक विश्रांती गृह बंद होते. त्यानंतर राज्यासह परराज्यातील रा.प.म.च्या शंभराहून अधिक बसेस मुक्कामी येत आहे. यामध्ये राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, नाशिक, जळगाव नांदेड, अमरावती आणि नागपूर या जिल्हासह कर्नाटक व गोवा (पणजी) राज्यातील रा.प.म.च्या विविध आगाराच्या बसेस नुक्कामी येत असतात.

केवळ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र या न्यासाने चालक-वाहक विश्रांती गृहाच्या अद्यावत सोयी-सुविधामुळेच शंभराहून अधिक बसेस मुक्कामी येत आहेत, यामुळे श्री स्वामी समर्थांच्या भक्तांची दळणवळणाच्या दृष्टीने सोय झाली आहे. श्रीक्षेत्र शिर्डी, शेगाव यासह तिरूपती बालाजी प्रमाणे येत्या काही वर्षांत तीर्थक्षेत्र अक्कलकोटचे भरभराट ही स्वामी समर्थाच्या आशिर्वादाने होणार आहे. याचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने वेध घेत विविध उपक्रमाच्या माध्यमातून कात टाकत आहे.

अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व न्यासाचे विश्वस्त, सेवेकरी यांनी नि:स्वार्थी करीत असलेल्या सेवेमुळेच अक्कलकोटचे नाव लौकिक होत आहे. दरम्यान, अन्नछत्र मंडळाचे सुरुवात करताना प्रथम राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागातील कर्मचार्‍यांनी केलेली मदत ही अनमोल आहे. तर त्याची उतराई म्हणून चालक-वाहक विश्रांती गृह व जड वाहनासाठी वाहनतळ सर्व सोयीनयुक्त न्यासाने उपलब्ध करुन दिले आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांकरिता अन्नछत्र मंडळाने केलेली सुविधा ही महामंडळाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखी आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या लांबपल्ल्यांच्या धावणार्‍या बससेच्या चालक व वाहकांकरिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने केलेली सोय उल्लेखनीय असून येथील सुविधांमुळे आम्ही चालक व वाहक आठवड्यातून दोन ते तीन दिवस श्रीक्षेत्र अक्कलकोटची ड्यूटी घेऊन येतो. न्यासाने केलेल्या सुविधांमुळे आम्ही समाधानी आहोत. राज्यातील प्रत्येक तीर्थक्षेत्र स्थळी अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे.
– चंद्रकांत पेडणेकर, चालक, रत्नागिरी आगार

Back to top button