खत विक्री : विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांची पिळवणूक | पुढारी

खत विक्री : विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांची पिळवणूक

बार्शी : गणेश गोडसे बार्शी तालुका हा कृषी खतांची एक मोठी बाजारपेठ आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. येथे शेजारी उस्मानाबद, लातूर आदी जिल्ह्यांतील शेतकरी खते खरेदीसाठी येत असतात. मात्र, दुकानदारांकडून वेगवेगळी कारणे देत त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे वैतागलेल्या शेतकर्‍यांची अवस्था पाहून विविध शेतकरी संघटनांनी खत विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक थांबवण्यात यावी, अशी मागणी वरिष्ठ अधिकार्‍यांकडके केली आहे.

बार्शी शहर व तालुक्यातील खत व बी-बियाणे विक्रेत्यांकडून होत असलेल्या शेतकर्‍यांच्या पिळवणुकीबाबत दै. ‘पुढारी’ने सविस्तर व सडेतोड वृत्तमालिका छापून शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. यास वरिष्ठ पातळीवरुन हालचाली सुरू असून नुकतेच सोलापुरातील अधिकार्‍यांनी बार्शी येथे जाऊन खत विक्री करणार्‍यांची तपासणी केली. दै. ‘पुढारी’ने अगदी आमच्या मनातील मांडून आमच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली, अशा प्रतिक्रिया शहर व तालुक्यातील शेतकरीबांधवामधून व्यक्त केल्या जात आहेत. दै. ‘पुढारी’ची वृत्तमालिका सुरू होताच खते गोडावून बाहेर काढून गोडावून मोकळे करण्यात आले.

यावेळी नागप्पा मुढे यांनी डीएपी व 1846 खते दिले नाही. खत घ्यायचे असेल तर दुसर्‍या माहिती नसलेल्या कंपन्यांच्या बॅगा घ्या, असा आग्रह केला जात असल्याचे सांगितले. बाळासाहेब घोडके यांनी खत घेण्यासाठी गेल्यावर अगोदर तर खत नसल्याचे उत्तर येते व नंतर इतर साहित्य घ्या खत देतो, असे सांगितले जाते. अशोक माळी या शेतकर्‍याने खतांच्या व औषधांचे वाढते दर शासनाने नियंत्रणात आणून शेतकर्‍यांना खत उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. पिंपळगाव येथील शेतकरी सूर्यकांत गिड्डे यांनी महाधनचे खत घेण्यास गेलो असता दुकानदाराने 20.20.0.13 हे खत असतानाही ते विकले आहे, असे सांगून देण्यास टाळाटाळ करुन दुसरे खत माथी मारण्याचा प्रयत्न केला. खत विक्री दुकानदारांकडून शेतकर्‍यांची अशा पद्धतीने पिळवणूक होत आहे.

जिल्हास्तरीय वरिष्ठ कृषी अधिकार्‍यांसह जिल्हाधिकार्‍यांनी स्वतः याकडे लक्ष केंद्रित करुन यापुढेही तालुक्यातील शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत होती. वरिष्ठ प्रशासन भविष्यात तरी याकडे लक्ष देणार का, हे आगामीकाळात दिसून येणार आहे. कोणावरही अवलंबून न राहता ते अन्यायाविरुद्ध उभे राहिले तरच शेतकर्‍यांना हा समाज जगू देईल; अन्यथा शेतकर्‍यांची अवस्था बिकट होणार आहे. इतर वेळी रस्त्यावर उतरणार्‍या शेतकरी संघटनांनीही या खताच्या व लिकिंगच्या प्रकरणात पुढे येणे गरजेचे आहे. त्यांनीही शेतकर्‍यांना कठीण प्रसंगात साथ देणे आवश्यक असल्याचे शेतकरी बोलत आहेत.

बार्शीच्या पूर्व भागातील पांगरी, गौडगाव, कुसळंब, चिखर्डे हा सोयाबीनचा पट्टा असतानाही या भागात कमी बफर स्टॉक देण्यात आला. हा या भागातील शेतकर्‍यांवर अन्याय आहे. याची दखल न घेतल्यास लवकरच आंदोलन सुरू करण्यात येईल.
– कृष्णा काशीद, रयत क्रांती संघटना तालुकाध्यक्ष

शेतकर्‍यांची परीक्षा न पाहता खते द्या. नाहीतर दुकानाला कुलूप लाऊन आंदोलन करण्यात येईल.
– शंकर गायकवाड, शेतकरी संघटना युवा प्रदेशाध्यक्ष

लिकिंग करुन शेतकर्‍यांना खते देण्यास टाळाटाळ केल्यास दुकानचालकास व अधिकार्‍यांना फटके देऊ.
– शरद भालेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बार्शी

खतांबाबत काही तक्रार असल्यास थेट माझ्या मोबाईलवर संपर्क साधून माहिती द्यावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करू.
– बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर

याबाबत शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे थेट तक्रारी कराव्यात. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
– शहाजी कदम, तालुका कृषी अधिकारी, बार्शी

आलेल्या तक्रारींनुसार आम्ही खत विक्रेत्यांना सूचना दिलेल्या आहेत. यापुढे तक्रारी आल्यास परवाना निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
– किशोर अंधारे, पंचायत समिती कृषी अधिकारी, बार्शी

Back to top button