औरंगाबाद : सोमवारपासून 50 टक्के पाणीपट्टी; वार्षिक कर दोन हजार रुपये | पुढारी

औरंगाबाद : सोमवारपासून 50 टक्के पाणीपट्टी; वार्षिक कर दोन हजार रुपये

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ऐन पावसाळ्यातही नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत असताना गेल्या महिन्यात तत्कालिन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील पाणीपट्टीत दोन हजार रुपयांची (50 टक्के) सवलत देण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार महापालिकेने ठराव मंजूर केला असून सोमवारपासून (दि.4) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शहरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकार्‍यांकडून प्रयत्न करण्यात येत असले तरी अद्यापही प्रशासनाला यश आलेले नाही, शहराच्या अनेक भागांत आजही आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो, तत्कालिन पालकमंत्री सुभाष देसाई हे 13 जून रोजी औरंगाबाद शहरात आले असता त्यांनी पाणीपुरवठा संदर्भात विविध 42 मुद्द्यांवर आढावा घेतला व पाणीपट्टी निम्मी करण्यात येत असल्याचे जाहीर केले. देसाई यांच्या दौर्‍यानंतर मात्र महापालिका प्रशासन पुन्हा सुस्त झाले, शहरात पाणी वाढले असल्याचा दावा करण्यात येत असला तरी शहरात मात्र अद्यापही पाण्याची मोठी टंचाई कायम आहे. शहरात पाणी मिळत नसले तरी पाणीपट्टी निम्मी करण्याबाबत मात्र पालिका प्रशासनाने तत्काळ पावले उचलत अंमलबजावणी केली. पाणीपट्टी निम्मी करण्यात येत असल्याचे जाहीर केल्यानंतर प्रशासनाने या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेशही देण्यात आले होते, त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी कर सुसूत्रीकरणासाठी अधिकार्‍यांची समिती स्थापन केली. या समितीने अभ्यास करून पंधरा दिवसांपूर्वी आपला अहवाल प्रशासकांना सादर केला होता.

एकाच डिमांड नोटमध्ये समावेश

यावर्षीपासून मालमत्ता कर आणिपाणीपट्टी एकाच मागणीपत्राच्या (डिमांड नोट) माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यात जुने म्हणजेच 4050 रुपये अशी पाणीपट्टीची नोंद होती. या सॉफ्टवेअरमध्ये आता दोन हजार रुपये असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारपासून नागरिकांना दोन हजार रुपये पाणीपट्टी भरता येणार आहे.

Back to top button