सोलापूर : शासन निर्णयासह इतर गोष्टींचा बळीराजाला फटका | पुढारी

सोलापूर : शासन निर्णयासह इतर गोष्टींचा बळीराजाला फटका

बार्शी , गणेश गोडसे :  खरीप हंगाम असो अथवा रब्बीचा, बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांची कधी खते, कधी बियाणे तर कधी इतर कृषी साहित्य खरेदीसाठी ससेहोलपट होत आहे. जगाचा पोशिंदा अशी बिरुदावली लावलेल्या बळीराजाला नेहमीच शासनाच्या निर्णयासह, खत, बी-बियाणे विक्रेते, कृषी विभागाच्या जाचक अटी, नियम यांचा सामना सहन करावा लागत आहे. यंदा बार्शी तालुक्यात खतांची तीव्र टंचाई भासत आहे.

बार्शीच्या कृषी विभागामार्फत तालुक्यासाठी मुबलक प्रमाणात खते, बी-बियाणे व औषधे उपलब्ध असल्याची दवंडी पेटवून देण्यात आली होती. लोकप्रतिनिधींनीही तालुक्यातील शेतकर्‍यांना पेरणीसाठी खते अथवा बियाणे कमी पडणार नाहीत किंवा कोणतीही अडचण उद्भवणार नाही याची काळजी कृषी विभागाने घ्यावी, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, निर्ढावलेल्या कृषी खात्याने सर्व सूचनांना किती गांभीर्यपूर्ण घेतले याची प्रचिती येत आहे. कारण, बाजारपेठेत सध्या 18.46, 1232, 10-26-26 आदी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप शेतकरी करताना दिसून येत आहेत.

शहर व तालुक्यातील खत विक्रेत्यांना शासन नियमानुसार दुकानात दर फलक व उपलब्ध साठा याचा फलक लावणे बंधनकारक असताना किती दुकानांत दर फलक व उपलब्ध साठ्याची माहिती सार्वजनिक केली जाते हा संशोधनाचा विषय ठरेल. यामागचा दुकानदारांचा उद्देश काय असावा, याचीही चर्चा होत आहे.
ग्रामीण भागातील साधाभोळा मळकट कपड्यातील शेतकरी शहरातील खत दुकानात खते खरेदीसाठी गेल्यावर त्या-त्या खत दुकानातील दुकानदार, विक्रेते व संबंधित शेतकरी यांच्यातील संवाद खरोखरच मनाला वेदना देणारा असाच असतो.

शेतकरी दुकानात गेल्यावर पहिला प्रश्‍न असतो तो काय घ्यायचे? तेव्हा शेतकर्‍याने सरळ खत पाहिजे असे उत्तर दिल्यास काय हवय का, असा प्रतिप्रश्‍न दुकानदाराकडून केला जातो व जर शेतकर्‍याने खतच हवंय असे सांगितले, तर प्रारंभी चक्क खतच शिल्लक नसल्याचे सांगत, बघतो असे मोघम उत्तर देऊन संबंधित शेतकर्‍यास आशेवर ठेवले जाते. त्यामुळे सामान्य शेतकरी तसाच दुकानासमोर गर्दीत उभा राहिल्यावर खताबरोबरच दुकानातील न खपला जाणारा लिंकिंगचा माल घेणार्‍या दुसर्‍या शेतकर्‍यास त्या पहिल्या शेतकर्‍याच्या समोरच खत दिले जाते. आपणालाही खत देतील या आशेवर तेथे ताटकळत थांबलेल्या पहिल्या शेतकर्‍याने याबाबत चौकशी केली असता खत पाहिजे असेल तर इतर साहित्य त्याबरोबर घ्यावे लागेल, असे ठणकावून सांगितले जाते व इतर साहित्य घेण्यास शेतकरी तयार नसल्यास खत नसल्याचे सांगून पिटाळून लावले जात असल्याची चर्चा होत आहे. नाहीतर त्या शेतकर्‍याच्या गळ्यात इतर औषधे, तणनाशके मारली जात असल्याचेही बोलले जात आहे.

वाहनधारक एजंट
तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वाहनधारक यांच्यावर खत टंचाईदरम्यान मोठी जबाबदारी दिली जाते. नियमित खत दुकानदारांच्या संपर्कात असलेले वाहनधारक हे एजंटरुपी भूमिका बजावत असल्याचे बोलले जाते. शेतकरी थेट दुकानात गेल्यावर खत उपलब्ध नसल्याचे सांगणारा खत विक्रेता ग्रामीण भागातील वाहनधारकांवर विश्‍वास ठेवून चढ्या दराने खत देतात. त्यामुळे वाहनधारक हे एजंट ठरत आहेत.

Back to top button