भोसरीची शाळा यंदाही पत्राशेडमध्येच

भोसरीची शाळा यंदाही पत्राशेडमध्येच

पिंपरी : भोसरीतील महापालिकेची छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाची माध्यमिक शाळेची इमारत धोकादायक असल्याने 2019 मध्ये पाडण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था शेजारी एका पत्राशेडमध्ये करण्यात आली आहे. तब्बल चार वर्षांनी इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र, काही किरकोळ कामे राहिल्यामुळे यंदाही नवीन इमारतीमध्ये वर्ग न भरता पत्राशेडमध्येच वर्ग भरले जाणार आहेत.

स्ट्रक्चरल ऑडिटनुसार इमारत धोकादायक

भोसरी गावठाणातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा सोयीची आहे. तसेच, जुनी शाळा म्हणून ती नावारुपाला आलेली आहे. भोसरीतील या शाळेची विद्यार्थिसंख्यादेखील मोठी आहे. मनपा शाळेची इमारत 40 वर्षे जुनी असल्याने शाळेचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. यामध्ये ही इमारत असुरक्षित असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही इमारत पाडून नव्याने बांधणी करणे गरजेचे होते. त्यानंतर शाळेच्या पुनर्बांधणी संदर्भातील बैठक महापालिकेत पार पडली.

विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका

या शाळेच्या परिसरात महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाची आणि नव्याने बांधलेली मराठी शाळेची इमारत आहे. मात्र, या दोन्ही शाळांमध्ये या मुलांची पर्यायी व्यवस्था होणे शक्य नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकरिता शाळेची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. तसेच, विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था महापालिकेने पत्राशेडमध्ये केली आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ कामे सुरू करण्यात आली आहेत. शाळेची गरज पाहता त्यानुसार वर्गखोल्या देण्यात येणार आहेत.

वाल्हेकरवाडी शाळेचे काम पूर्ण; भोसरी शाळा अर्धवट

स्ट्रक्चर ऑडिटमध्ये भोसरी आणि वाल्हेकरवाडीतील मनपा शाळा या दोन्ही शाळा धोकादायक ठरविण्यात आल्या होत्या. भोसरी शाळा पाडल्यांनतर दोन वर्षांनंतर वाल्हेकरवाडी शाळेचेदेखील स्थलांतर करून पत्राशेडच्या शेजारी नवीन इमारतीचे काम सुरू होते. भोसरी शाळेच्या मागून बांधकामास सुरुवात करूनही वाल्हेकरवाडी शाळेचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.

शाळेच्या इमारतीचे वरच्या छताचे काम राहिले आहे. ते चार दिवसांत पूर्ण होणार आहे. तीन मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, काही विद्युत यंत्रणेची कामे सुरू आहेत. ऑगस्टमध्ये ते काम पूर्ण होईल. तरीदेखील शिक्षण विभागाने मागणी केली तर, खालचे दोन मजले जूनअखेरीस देता येऊ शकतात.

– शैलेंद्र चव्हाण, उपअभियंता, महापालिका

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news