सोलापूर : भाविकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात | पुढारी

सोलापूर : भाविकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

पंढरपूर , पुढारी वृत्तसेवा :  आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 10 जुलै रोजी होत आहे. या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्याप्रमाणात वारकरी भाविक येत असतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे 4 जुलै, तर जगद‍्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 5 जुलै रोजी आगमन होणार आहे. त्याचबरोबर अन्य संतांच्या पालख्यांचे जिल्ह्यात आगमन होणार आहे. या कालावधीत संबंधित यंत्रणेने सतर्क राहून येणार्‍या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

आषाढी यात्रा पालखीसोहळा नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह अकलूज येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, उपमुख्याधिकारी ईशाधीन शेळकंदे, तहसीलदार जगदीश निंबाळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, आषाढी यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत येणार्‍या भाविकांना आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा स्वच्छता आदी बाबींचे योग्य नियोजन करावे. श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यातील पाण्याचे टँकर भरण्यासाठी माळशिरस तालुक्यात 43 विहिरी व विंधन विहिरी यांचे अधिग्रहण केले आहे. पालखीमार्गावर एकूण 63 ठिकाणी पाणी भरण्याची सोय केलेली आहे. पालखीमार्गावर पाणीपुरवठा विभागाने टँकर भरण्याच्या ठिकाणांची माहिती पोलिस विभागाला द्यावी, जेणेकरुन पाणी भरण्यासाठी जे टँकर जातील त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल, असे त्यांनी सूचित केले. तसेच, पालखीमार्गावर कोणतेही अतिक्रमण राहणार नाही याची दक्षता संबधितांनी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी निर्देशित केले.

आरोग्य विभागाने औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करावा.आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करावेत. वीज वितरण विभागाने अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा करावा. वाहतूक व पोलिस विभागाने वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याबाबत नियोजन करावे. पाटबंधारे विभागाने वेळेत कॅनालला पाणी सोडण्याचे नियोजन करावे. पालखीतळावर, पालखीमार्गावर, मुक्काम ठिकाणी फिरते शौचालय, तात्पुरत्या शौचालयांची पुरेशी व्यवस्था करून ती वेळोवळी स्वच्छ राहतील यासाठी कर्मचार्‍यांची नेमणूक करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी दिल्या.

आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखीमार्गावरील ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून कोणत्याही प्रकारच्या साथ रोगाचा फैलाव होणार नाही याबाबत आरोग्य यंत्रणा योग्य ती दक्षता घेत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
यावेळी प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी पालखीमार्ग, रिंगण सोहळा व मुक्कामाच्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व येणार्‍या सोयीसुविधांची माहिती दिली.

21 ठिकाणी कोरोना लसीकरण व तपासणी
माळशिरस तालुक्यात 21 ठिकाणी कोरोना लसीकरण व तपासणी केंद्र, 34 उपचार केंद्र, विलगीकरण कक्षासाठी 175 बेडची व्यवस्था, 18 स्तनपान कक्ष, सुसज्ज रुग्णवाहिका, पुरेसा औषधसाठा उपलब्ध असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहिते यांनी सांगितले.

Back to top button