‘विठ्ठल’साठी तिरंगी की चौरंगी लढत? | पुढारी

‘विठ्ठल’साठी तिरंगी की चौरंगी लढत?

पंढरपूर : सुरेश गायकवाड विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारा दरम्यान चुरशीने ही निवडणूक तिरंगी होणार की चौरंगी होणार, हे उद्या 27 रोजी स्पष्ट होणार आहे. याबाबत तालुकावासीयांना उत्सुकता लागली आहे.
सत्ताधारी भालके-काळे गटाकडून नियोजनबद्धपणे प्रचार सुरू असून, जुन्या सहकार्‍यांना थांबवून नवीन चेहर्‍यांना उमेदवारीची संधी दिली जात आहे. विरोधी युवराज पाटील गटाकडून व अभिजित पाटील गटाकडूनही स्वतंत्र पॅनेल उभारुन कडवे आव्हान निर्माण केले जात आहे. यांनीही तरुण चेहर्‍यांना संधी देत परिवर्तन करण्याचा मनसुबा आखला आहे. डॉ. बी.पी. रोंगे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला असला तरी त्यांच्या पत्नीचा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे या निवडणुकीत चौथे पॅनेलही उतरले आहे.

विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा पंढरपूर तालुक्याचा राजवाडा आहे. हा कारखाना गाळप हंगामात 14 ते 15 लाख मे.टन ऊस गाळप करतो. मात्र गतवर्षी हा कारखाना गाळप हंगाम सुरू करु शकला नाहीच. मात्र शेतकर्‍यांचे, वाहतूकदारांचे व कामगारांचे पैसेही देऊ शकला नाही. त्यामुळे या कारखान्याच्या संचालक मंडळावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच या सत्ताधारी भालके-काळे गटातून बाहेर पडत संचालक युवराज पाटील यांनी अ‍ॅड. गणेश पाटील, अ‍ॅड. दीपक पवार यांना बरोबर घेऊन स्वतंत्र पॅनेल उभे ठाकले आहे. युवराज पाटील यांच्या या भूमिकेमुळे भालके-काळे पॅनेलसमोर अडचणी निर्माण झाल्याचे दिसत आहे. यातच धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभारुन सत्ताधारी गटासमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे.

प्रचारात आघाडी घेत अनेक शेतकरी संघटनांचा पाठिंबा मिळवण्यातही यश मिळवले आहे. विशेष म्हणजे तरुण चेहर्‍यांना मैदानात उतरवले आहे. ‘विठ्ठल’च्या निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना ऐनवेळी डॉ. बी.पी. रोंगे यांनी उमेदवारी अर्ज अवैध ठरुनही त्यांनी पत्नीचा उमेदवारी अर्ज भरत स्वतंत्र पॅनेल तयार करुन प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे ‘विठ्ठल’ची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. आता ‘विठ्ठल’च्या रणधुमाळीत तिरंगी लढत होते की चौरंगी होते, हे पाहण्याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

सत्ताधार्‍यांची प्रतिष्ठेची, तर विरोधकांचे अस्तित्व पणाला

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी 21 जागा निवडून द्यायच्या आहेत. याकरिता 25 हजार 392 मतदार आहेत. युवराज पाटील यांचे बंड, तर अभिजित पाटील यांचे कडवे आव्हान मोडून काढण्यासाठी भालके-काळे पॅनेलकडूनही आजी-माजी संचालकांना नारळ देऊन तरुण चेहर्‍यांना संधी देत ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. ही निवडणूक सत्ताधार्‍यांच्या प्रतिष्ठेची, तर विरोधकांच्या अस्तित्वाची ठरणार आहे.

Back to top button