कर्नाटक भाजपचा मुस्लीम आरक्षणासंबंधीचा व्हिडीओ हटवा, ‘एक्स’ला निवडणूक आयोगाची सूचना | पुढारी

कर्नाटक भाजपचा मुस्लीम आरक्षणासंबंधीचा व्हिडीओ हटवा, ‘एक्स’ला निवडणूक आयोगाची सूचना

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक भाजपचा मुस्लीम आरक्षणासंबंधीचा व्हिडीओ हटवा, अशी सूचना मंगळवारी (७ मे) निवडणूक आयोगाने ‘एक्स’ला दिली. कर्नाटक भाजपने राज्यातील मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावरुन एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओ बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर ही सुचना दिली आहे.

कर्नाटकमध्ये मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपने काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी कर्नाटक भाजपच्या BJP4Karnataka या एक्स खात्यावरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. त्या व्हिडीओ विरोधात निवडणूक आयोगत तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने यावर कारवाई करत एक्सला कर्नाटक भाजपची व्हिडीओ पोस्ट हटवण्याची सूचना दिली.

‘एक्स’च्या नोडल अधिकाऱ्याला दिलेल्या सूचनेत निवडणूक आयोगाने म्हणले आहे की, “बीजीपे4कर्नाटका (BJP4Karnataka) या एक्स अकाउंटवरून करण्यात आलेली पोस्ट कायद्याच्या चौकटीचं उल्लंघन करणारी आहे. या प्रकरणात याआधीच एफआयआर नोंदवण्यात आला आहे.” माहिती तंत्रज्ञान कायदाच्या कलम ७९(३)(ब) आणि माहिती तंत्रज्ञान नियम २०२१च्या ३(१)(ड) नियमाअंतर्गत ही पोस्ट हटवण्याची सूचना देण्यात आली आहे. तर निवडणूक आयोगाने संबंधित सूचनेच्या पत्रात पोस्टची लिंक आणि एफआयआरची प्रतदेखील सोबत जोडली आहे.

Back to top button