मी शेतकर्‍यांच्या हितासाठी दिल्‍लीत काम करणार : खासदार धनंजय महाडिक | पुढारी

मी शेतकर्‍यांच्या हितासाठी दिल्‍लीत काम करणार : खासदार धनंजय महाडिक

टाकळी सिकंदर , पुढारी वृत्तसेवा :   विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर माझा ठाम विश्‍वास होता. मी निश्‍चिंत होतो, पण माझे तमाम कार्यकर्ते विजयाची खात्री नसल्याने नाराज होऊन सारखे फोन करत होते. परंतु पक्षाने मला तिकीट देऊन विश्‍वास दाखवला आणि निवडूनही दिले. आता शेतकर्‍यांसाठी म्हणून दिल्लीत काम करणार. मी शेतकर्‍यांचा खासदार आहे, तुम्ही निश्‍चिंत राहा, असे राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक म्हणाले.

भीमा परिवार व लोकशक्‍ती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी सिकंदर येथील कै. भीमराव महाडिक पटांगणावर खा. धनंजय महाडिक यांचा मंगळवारी (ता.21) भव्य सत्कार करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या सत्कार सोहळ्यास मोहोळसह, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील सभासद व शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.

यावेळी लोकशक्ती परिवाराचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, धनंजय महाडिक यांच्या आई मंगल महाडिक, पत्नी अरुंधती महाडिक, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक, विनोद महाडिक, पवन महाडिक, जकराया शुगरचे बिराप्पा जाधव, ‘भीमा’ उपाध्यक्ष सतीश जगताप, मोहोळ तालुका भाजप अध्यक्ष सुनील चव्हाण, संजय क्षीरसागर, तानाजी गुंड, शंकरराव वाघमारे, शिवाजीराव गुंड, सुशील क्षीरसागर, भीमराव वसेकर, नानासाहेब पवार, छगन पवार, पांडुरंग बचुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार धनंजय महाडिक यांची पुळूज गावापासून टाकळी सिकंदर शिवाजी चौकापर्यंत गाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी भीमा शुगरचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी प्रास्ताविक, तर पांडुरंग ताटे यांनी सूत्रसंचालन केले. खा. महाडिक म्हणाले, मोहोळ तालुक्यातील नेते सूडबुद्धीने राजकारण करतात. त्यांनी मागील काळात सत्ता असल्याने प्रचंड त्रास दिला आहे. आम्ही तो सहनही केला; परंतु यापुढे आम्ही सहन करणार नाही. आता मात्र करारा जवाब देऊ. आमचा अंत पाहू नये, असे म्हणाले.

यावेळी प्रा. संग्राम चव्हाण, सर्जेराव चवरे, समता गावडे, अ‍ॅड. बिराप्पा जाधव, भीमराव वसेकर, माऊली जाधव, शैलेश क्षीरसागर, संजय क्षीरसागर, शंकरराव वाघमारे, कल्याणराव काळे, भगीरथ भालके आदींनी आपले विचार व्यक्त केले. या सत्कार सोहळ्यास मोहोळसह, पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी सभासद उपस्थित होते.

Back to top button