सावंतवाडीत सलग तीन दिवस चोरीचे सत्र सुरूच | पुढारी

सावंतवाडीत सलग तीन दिवस चोरीचे सत्र सुरूच

सावंतवाडी : पुढारी वृत्तसेवा शहरात गेले 3 दिवस चोरीचे सत्र चालून असून शनिवारी सलग तिसर्‍या दिवशी येथील विठ्ठल मंदिर परिसरातील घरफोडी चोरीचा प्रयत्न झाला. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. मात्र घराचे मूळ मालक मनोज गोवेकर हे कामानिमित्त मुंबई येथे असल्याने ते सावंतवाडीत दाखल झाल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तर परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक सूरज पाटील यांनी दिली.

बुधवारी उभाबाजार येथील टंगसाळी यांचे बंद घर फोडून चोरट्यानी चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर गुरुवारी दुसर्‍या दिवशी वैश्यवाडा येथील बंद घर फोडून चोरीचा प्रकार घडला तर शुक्रवारी सलग तिसर्‍या दिवशी विठ्ठल मंदिर परिसरातील एका बंगल्यात चोरीचा प्रकार घडला. सलग तिसर्‍या दिवशी भरवस्तीत घडलेल्या या चोरीच्या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्याने बंगल्याच्या कंपाउंडच्या गेटचे कुलूप न तोडत काठड्यावरून आत उडी घेत बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला.

ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. शेजार्‍यांना बंगल्याचे कुलूप तुटले असल्याचे निदर्शनास येताच याबाबत माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बंगल्याची पाहणी केली. बंगल्यात अस्ताव्यस्त कपडे पडले होते. घरमलक मनोज गोवेकर यांना संपर्क साधला असता घरात कोणतेही मौल्यवान साहित्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

मालवणात आणखी दोन घरफोड्या

मालवण ः पुढारी वृत्तसेवा मालवण शहरात बाजारपेठ मार्गावरील पाटकर कुटुंबियांची दोन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे.शुक्रवारी याच परिसरात काही अंतरावर तीन ठिकाणी घरफोडी झाली होती. हे पाहता चोरट्याने त्याच वेळी याही ठिकाणी डल्ला मारला असावा. अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

मालवण बाजरपेठ येथील स्मिता किशोर पाटकर कुटुंबीय बाहेरगावी असल्याने त्यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा पिन चोरट्यांनी काढून टाकल्याचे दिसून आले. तर त्याच घरा बाजूला हनुमंत पाटकर यांचे स्टोअर रूम घर चोरट्यानी फोडल्याचे आज दिसून आले. मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलिस पथक तसेच ओरोस येथील ठसे तज्ज्ञ दाखल झाले. अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.

Back to top button