सोलापूर विद्यापीठ परीक्षा बहुपर्यायी, ऑफलाईनच | पुढारी

सोलापूर विद्यापीठ परीक्षा बहुपर्यायी, ऑफलाईनच

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर विद्या शाखांच्या सर्व सत्रांच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता बहुपर्यायी प्रश्नांद्वारे ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. दि. 14 जुलै 2022 पासून परीक्षा सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षासंदर्भात गोंधळ सुरू होता. परीक्षा ऑफलाईन, बहुपर्यायी पद्धतीनेच घ्याव्यात, यासाठी कुलगुरूंना विद्यार्थी संघटनांनी निवेदन दिले होते. विद्यापीठाने मात्र परीक्षा ऑफलाईन वर्णनात्मक प्रश्न पद्धतीनेच घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. विद्यापीठाच्या या निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षातील मंडळींनी एकत्र येऊन विद्यापीठासमोर आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करून परीक्षा पुढे ढकलावी तसेच परीक्षा या ऑफलाइन बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी केली होती.

मार्च-एप्रिल 2022 हंगामी सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा 20 जून ते 6 ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार होत्या. तसे अंतिम वेळापत्रकही विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले होते. पण विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून विद्यापीठाने सर्वच परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करून परीक्षा ऑफलाईन बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. नवे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Back to top button