खते, कीटकनाशके 63 विक्रीपरवाने निलंबित | पुढारी

खते, कीटकनाशके 63 विक्रीपरवाने निलंबित

सोलापूर : महेश पांढरे : दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने अशा कृषी निविष्ठांची विक्री करणार्‍यांची तपासणी सुरूच असते.त्यामध्ये गेल्या वर्षभरात सन 2021-22 मध्ये जिल्ह्यात 860 ठिकाणी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1811 बियाणे, खते, कीटकनाशके आणि रासायनिक खतांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी जवळपास 1654 नमुने प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1570 नमुने हे प्रमाणित असल्याचे आढळून आले, तर 84 नमुने अप्रमाणित आढळलेे. त्यामुळे 63 जणांचे नमुने निलंबित करण्यात आले, तर 6 जणांचे परवाने कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहेत. 33 विक्रेत्यांविरोधात कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे.

सध्या सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागही आता जागृत झाला असून, जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये, यासाठी खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रेत्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी बोगस आणि निकृष्ठ दर्जाच्या कृषी निविष्ठा आणि खतांची विक्री आढळून येईल, त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हा कृषी विभागाने दिले. जिल्ह्यात यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. खरिपाचे सरासरी क्षेत्र 2 लाख 34 हजार हेक्टर असले तरी यंदा सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले
आहे.

यंदा 3 लाख 40 हजार 67 हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित धरुन कृषी विभागाने त्यासाठी लागणार्‍या बियाणे आणि खतांची उपलब्धता करुन ठेवली आहे. गतवर्षी सरासरीच्या 90 टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदाही हे क्षेत्र वाढेल, असा विश्‍वास कृषी विभागाला आहे.
यंदा सोयाबीन, उडीद, मूग, सूर्यफुल, कारळे, तूर, बाजरी या पिकांची पेरणी वाढण्याची शक्यता असली तरी पावसामुळे या पेरण्या पुरत्या खोळंबल्या आहेत. यासाठी लागणार्‍या रासायनिक खतांचीही तजवीज कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. 2 लाख 91 हजार 900 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी जिल्हा कृषी विभागाने केली असून त्या बदल्यात जिल्ह्याला 95 हजार 305 मेट्रिक टन खतांचा पुरवठा झाला आहे. उर्वरित खतांसाठी विविध कंपन्याशी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.

सध्या जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्यांसाठी घाई करू नये. जमिनीत योग्य ओल निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
लोकमंगल बायोटेकच्या खताचा नमुना अप्रमाणित आला असून, त्यासंदर्भात नोटीस बजावण्यात येणार आहे.
– बाळासाहेब शिंदे
जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर

कमी मनुष्यबळातही कारवायांचा धडाका

सध्या जिल्हा कृषी विभागाकडे अशा बोगस विक्रेत्यांची सातत्याने तपासणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नाही, तरीही कारवायांचा धडाका लावाला आहे. कृषी विभागाकडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक 1, अर्धवेळ निरीक्षक 19, जिल्हा परिषद कृषी विभागाचे 14, असे जिल्हा कृषी विभागाकडे केवळ 34 गुणवत्ता निरीक्षक असतानाही गेल्या वर्षभरात 860 ठिकाणी धाडी टाकून तपासण्या केल्या आहेत.

जिल्ह्यात आठ हजारांच्यावर कृषी दुकाने

जिल्ह्यात कृषी विभागाने परवाना दिलेले जवळपास 8 हजार अधिकृत विक्रेते असून, यामध्ये 3 हजार 182 बियाणे विक्रेते आहेत. 2 हजार 548 रासायनिक खत विके्रते, तर 2 हजार 78 किटकनाशके विक्रेते आहेत. त्यांची सातत्याने तपासणी केली जाते. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारी वरुनही ऐनवेळी तपासणी केली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांनी चुकीच्या लोकांच्या तक्रारी कृषी विभागाकडे कराव्यात.

Back to top button