सांगलीने घेतला मोकळा श्वास | पुढारी | पुढारी

सांगलीने घेतला मोकळा श्वास | पुढारी

सांगली ः पुढारी वृत्तसेवा

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून सांगलीची अर्थव्यवस्था लॉक झाली होती. शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिकांवर आर्थिक संकट कोसळले होते. कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याने अर्थव्यवस्थेचा  श्वास गुदमरत होता. मात्र सोमवारपासून काही निर्बंधानुसार किराणा दुकाने, फळ मार्केट, कृषी सेवा केंद्र आणि सलून सुरू करण्याची वेळ वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सांगलीने सोमवारी मोकळा श्वास घेतला.  

उद्योग, व्यवसाय ठप्प झाल्याने नेहमी लोकांच्या गर्दीने फुलणार्‍या बाजारपेठेची अवस्था पाहू नये अशी  झाली होती. लाखो रुपयांची गुंतवणूक करून सुरू केलेला व्यवसाय बंद असल्याने व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. चहाटपरी, खाद्यपदार्थ विक्रेते, हातगाडे  व्यावसायिक, सलून दुकानदार, भाजी, फळ विक्रेते अशा छोट्या व्यावसायिकांचे तर खूप हाल झाले.

गेल्या चार दिवसांपासून  जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किराणा, भाजीपाला,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्ड, फळ विक्री, बेकरी, मिठाई, पेट शॉप्स, मटन, चिकन, अंडी यासह सर्वंच जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहारांना सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बाजारपेठेत दिवसभर खरेदीसाठी लोकांची रहदारी सुरू होती. 

काही ठिकाणी लोकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. मात्र अनेक ठिकाणी  नियमांचे उल्लंघन झाले. बाजारपेठा सुरू ठेवण्याची वेळ वाढवल्याने फारशी गर्दी दुकानात दिसत नव्हती. 

भाजी, फळ विक्री सुरळीत 

गेले काही दिवस शेतीमालास बाजारपेठच उपलब्ध न झाल्याने कवडीमोल भावाने भाजी, फळे विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती. अनेक भागात शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत भाजी आणि फळे शेतातच कुजून गेली. परिणामी घातलेला खर्च काढायचा कसा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला होता. मात्र सोमवारी सांगलीत सुरळीतपणे भाजीपाला, फळ विक्री सुरू होती. खरेदीसाठी लोकांची दिवसभर रेलचेल  होती. त्यामुळे शेतकर्‍यांतून आनंद  व्यक्त होत होता.  

रिक्षाचालक आनंदित 

सांगली, मिरजेत रिक्षाचालकांची संख्या मोठी आहे. या व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नावर अनेकांचा संसार चालतो. मात्र रस्त्यावर लोकच नसल्याने  रिक्षाचालकांना मोठा फटका बसला होता. सोमवारी शहरात लोकांची रहदारी होती. अनेकांनी प्रवासासाठी  रिक्षाचा आधार घेतला. त्यामुळे रिक्षाचालकांना दोन पैसे मिळाल्याने समाधान व्यक्त होत होते.   

कामगारांतून समाधानाची भावना 

मिरज, कुपवाडसह जिल्ह्याच्या अनेक भागात औद्योगिक वसाहती आहेत. त्याशिवाय छोटे-मोठे कारखाने विखुरलेले आहेत. हजारो लोक त्याठिकाणी काम करतात. दररोज लाखो  रुपयांची याठिकाणी उलाढाल होते. मात्र कोरोनाने औद्योगिक वसाहती पूर्णपणे बंद होत्या. मात्र कडक नियमाने 50 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत काही औद्योगिक वसाहती सुरू झाल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांबरोबरच कामगारांतून समाधान व्यक्त होत आहे.

किराणा मालाची सुरळीत विक्री

किराणा माल हा लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंपैकी आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांना लपून-छपून माल घेण्याची-देण्याची वेळ आली. काही दुकानदारांनी गैरफायदा घेऊन चढ्या दराने मालाची विक्री केली. मात्र सोमवारपासून दुकानांची वेळ वाढवल्याने हव्या असणार्‍या वस्तू योग्य किंमतीत मिळाल्याने ग्राहकांतून समाधान व्यक्त होत होते. 

कृषी दुकानांतही शेतकर्‍यांची गर्दी

खरीप हंगाम तोंडावर आहे. पेरणी पूर्व मशागतीच्या कामांसाठी शेतकर्‍यांची धांदल सुरू आहे. कृषी सेवा केंद्र सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बी-बियाणे, खते, औषधे घेण्यासाठी शेतकर्‍यांची कृषी दुकानात गर्दी झाली होती. 

मार्निंक वॉकसाठी अनेकजण घराबाहेर 

सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, सायकल चालविण्यासाठी सोमवार ते  शुक्रवारी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पहाटेपासून अनेक मैदानांवर  व्यायाम   करण्यासाठी लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सार्‍यांची गर्दी झाली होती. मार्निंक वॉकसाठी लोक सकाळी घराबाहेर पडले होते.

विष्णूअण्णा फळ मार्केट, मार्केट यार्ड पुन्हा गजबजले

सांगली बाजार समितीमध्ये दररोज सुमारे 50 लाख रुपयांची उलाढाल होते. मात्र गेल्या महिन्याभरापासून बाजार समिती बंद होती. परिणामी कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. मात्र काही नियमांनुसार मार्केट सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे सकाळपासून फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली होती. मार्केट यार्डात हळद, बेदाणा, गूळ सौदे सुरळीतपणे सुरू झाले आहेत. परिणामी हमाल तोलाईदारांसह या क्षेत्राशी निगडित कर्मचारी आनंदित झाले आहेत. गेल्या तीस दिवसांपासून शांत असलेले मार्केट यार्ड आज पुन्हा गजबजले होते.

Back to top button