पंचगंगेत ट्रॅव्हलर कोसळून १३ ठार | पुढारी

पंचगंगेत ट्रॅव्हलर कोसळून १३ ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी

चालकाचा ताबा सुटून भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर शिवाजी पुलाचा कठडा तोडून थेट पंचगंगा नदीत 100 फूट खोल कोसळली. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात 13 जण जागीच ठार झाले. स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या धाडसाने तिघींना जीवदान मिळाले.

नवस फेडून गणपतीपुळ्याहून कोल्हापुरात येताना बालेवाडी (पुणे) येथील भरत केदारी यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. या अपघातात भरत केदारी यांचा मुलगा, दोन सुना, एक मुलगी, जावई आणि सात नातवंडे असे एकाच कुटुंबातील 12 जण ठार झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांसह पोलिस, शासकीय यंत्रणेचे तब्बल आठ तास मदत आणि बचावकार्य सुरू होते. या अपघातानंतर संतप्‍त झालेल्या नागरिकांनी शिवाजी पुलावरील वाहतूक बंद केली. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत सरकारच्या वतीने जाहीर केली आहे.

सचिन भरत केदारी (वय 34), सौ. नीलम सचिन केदारी (30), संस्कृती सचिन केदारी (8), सानिध्य सचिन केदारी (9 महिने), भावना दिलीप केदारी (35), साहिल दिलीप केदारी (14), श्रावणी दिलीप केदारी (11), सौ. छाया दिनेश नांगरे (41), प्रतीक दिनेश नांगरे (14, सर्व रा. बालेवाडी, पुणे), संतोष बबनराव वरखडे (45), गौरी संतोष वरखडे (16), ज्ञानेश्‍वरी संतोष वरखडे (14 सर्व रा. पिरंगुट, पुणे) यांच्यासह चालक महेश लक्ष्मण कुचीकर (45, रा. हिंजवडी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. सौ. मंदा भरत केदारी (54), मनीषा संतोष वरखडे (38) व प्राजक्‍ता दिनेश नांगरे (18) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.

सात वर्षांनी मुलगा झाल्याने नवस फेडण्यासाठी गणपतीपुळ्यास!
सचिन भरत केदारी यांना सात वर्षांनी सानिध्य हा मुलगा झाला होता. त्यासाठी केलेलेे नवस फेडण्यासाठी आणि जोडून सुट्ट्या आल्याने केदारी कुटुंबीयांनी सहलीचे नियोजन केले होते. आई मंदासह सचिन केदारी, त्यांची पत्नी सौ. नीलम, मुलगी संस्कृती, मुलगा सानिध्य, वहिनी भावना दिलीप केदारी, पुतण्या साहिल, पुतणी श्रावणी, बहीण सौ. छाया नांगरे, तिचा मुलगा प्रतीक, मुलगी प्राजक्‍ता, दुसरी बहीण मनीषा वरखडे, तिचे पती संतोष वरखडे, भाची गौरी व ज्ञानेश्‍वरी असे 15 जण साई ट्रॅव्हल्सच्या 17 सीटर टेम्पो ट्रॅव्हलरमधून (एमएच-12 एनएक्स-8556) गणपतीपुळ्याकडे गुरुवारी पहाटे घराबाहेर पडले होते.

गणपतीपुळे येथून देवदर्शन करून हे सर्व जण शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने निघाले. शुक्रवारी रात्री कोल्हापुरात मुक्‍काम करायचा, शनिवारी अंबाबाई आणि जोतिबाचे दर्शन करून पुन्हा कोल्हापुराच मुक्‍काम करायचा. रविवारी सकाळी नृसिंहवाडीला जायचे आणि तेथून पुण्याला माघारी जाण्याचा बेत त्यांनी केला होता. गणपतीपुळ्याहून कोल्हापुरात येत असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर शिवाजी पुलावर आली.

गाडीवरचा ताबा सुटला आणि ट्रॅव्हलर 100 फूट खोल कोसळली
भरधाव वेगात असलेल्या या ट्रॅव्हलरवरील चालकाचा ताबा सुटला. पूल पार करण्यासाठी अवघे दहा फुटांचे अंतर शिल्लक असताना, पुलाच्या उजव्या बाजूचा संरक्षक कठडा तोडून ट्रॅव्हलर सुमारे 100 फूट खोल थेट पंचगंगा नदीपात्रात कोसळली. ट्रॅव्हलर नदीपात्रातील मोठ्या खडकांवर आदळत पाण्यात शिरली. खडकावर जोराने आदळल्याने मागील दरवाजे अर्धवट उघडले गेले.

प्रचंड आवाज
दरम्यान, जोरदार आवाज झाला. त्यामुळे नव्या पुलाखाली, दशपिंडी घाटावर असलेल्या काही तरुणांचे पुलाखाली लक्ष गेले. दरम्यान, राणे नावाच्या एका तरुणाने गाडी पडताना पाहिली आणि त्याने आरोळी ठोकली.  याचवेळी पुलावरून जाणार्‍या वाहनधारकांनी आरडाओरडा केला.यानंतर काही तरुण पूल कोसळला, गाडी पडली, असे ओरडत बुधवार पेठेच्या दिशेने गेले. सोल्जर ग्रुप परिसरात ‘हिप्नॉटिझम’चा कार्यक्रम सुरू होता. यामुळे नागरिक, तरुण मोठ्या संख्येने होते. ओरडत आलेल्या तरुणांना पाहून येथील तरुण, नागरिकांनी पंचगंगा नदीच्या दिशेने धाव घेतली.

बुडणार्‍यांना हात देऊन वाचवले
याचवेळी महापालिका कर्मचारी प्रवीण डांगे आणि आंबेवाडीकडून घराकडे येणार्‍या कुणाल भोसले यांनी ओरडण्याचा आवाज ऐकून पंचगंगा पुलाखाली धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ शाहरूख भाटकर, किरण जाधव, अक्षय आपटे, केदार शिंदे, रोहित पाटील हे घटनास्थळी आले. कुणाल आणि प्रवीण यांनी मोठ्या धाडसाने पाण्यात जाऊन मदतीसाठी टाहो फोडणार्‍यांना हात दिला. या दोघांनी पाण्यात अर्धवट बुडत असलेल्या प्राजक्‍ता नांगरे हिला बाहेर काढले. कुणालने तिला तोंडावाटे श्‍वासोच्छ्वास दिला. यानंतर मनीषा वरखडे हिला गाडीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर मंदा केदारी यांना बाहेर काढण्यात आले. मंदा यांचा पाय गाडीत अडकला होता, तो काढताना कुणालच्या पायालाही दुखापत झाली. त्या अवस्थेत कुणालने प्रवीणच्या मदतीने मंदा यांनाही बाहेर काढले. त्यांच्या पोटावर दाब देऊन पोटातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर या तिघांनाही नागरिकांनी खांद्यावर घेत परीट घाटाकडून पंचगंगा घाटावर आणले. तेथून रुग्णवाहिकेतून त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

याच दरम्यान गौरी वरखडे, ज्ञानेश्‍वरी वरखडे, साहिल दिलीप केदारी व प्रतीक दिनेश नांगरे या चौघांनाही नागरिकांनी बाहेर काढले. मात्र, गौरीच्या मानेला लोखंडी बार लागल्याने ती जागीच ठार झाली होती. तर अन्य तिघेही गंभीर जखमा आणि नाका-तोंडात पाणी गेल्याने जागीच गतप्राण झाले होते. या चौघांचेही मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आले. सुमारे अर्धा तास प्रयत्न करून स्थानिक तरुणांनी या सात जणांना गाडीबाहेर काढले, त्यातील तिघांनाच वाचवण्यात यश आले.

गाडी ओढून धरण्याचाप्रयत्न अयशस्वी
ट्रॅव्हलर खडकावर आदळून पाण्यात शिरली. हळूहळू गाडी पाण्यात खोल जात होती. पाठीमागील दरवाजा काहीसा उघडला गेल्याने, सात जणांना बाहेर काढता आले. या सात जणांना बाहेर काढल्यानंतर गाडी पुढे सरकत पूर्णपणे पाण्यात गेली. काही तरुणांनी गाडी ओढून धरण्याचाही प्रयत्न केला. मात्र, अरूंद आणि धोकादायक जागा आणि अपुरी पडलेली ताकद यामुळे पाण्यात जाणारी गाडी रोखता आली नाही. गाडी पूर्णपणे पाण्यात गेल्याने मदतकार्यात अडथळा आला.

पोलिसांसह अधिकारी मदत पथके दाखल
या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्‍निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ व्हाईट आर्मी, जीवन ज्योतीसह आपत्ती व्यवस्थापन कक्षातील जवान, अधिकारीही घटनास्थळी आले. शासकीय अधिकार्‍यांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघाताची माहिती वार्‍यासारखी शहरभर पसरली. शहराच्या विविध भागातून तरुण, नागरिक शिवाजी पुलाकडे येऊ लागले. यामुळे काही वेळात पुलावर प्रचंड गर्दी झाली. ही गर्दी आवरताना पोलिसांची दमछाक होत होती. नागरिकांबरोबर वाहनांचीही गर्दी होऊ लागल्याने पोलिसांनी दसरा चौक तसेच वडणगे फाटा येथून वाहतूक अन्य मार्गाने वळवली.

मदतकार्याला वेग
पाण्यात बुडालेल्या गाडीत नेमके किती प्रवासी होते, आत कोणी आहे की नाही, याची नेमकी माहिती मिळत नव्हती. याच दरम्यान सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या प्राजक्‍ता नांगरे या युवतीने गाडीत चालकासह 16 जण होते, असे सांगितले. तसेच आजोबा भरत केदारी यांचा मोबाईल क्रमांक दिला. पोलिसांनी केदारी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला. यावेळी गाडीत 16 जण होते, याची खात्री झाली. गाडीतून सात जणांना बाहेर काढण्यात आले होते. यामुळे गाडीत आणखी नऊ जण असल्याचे समजताच मदतकार्याला वेग आला.

पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन
दरम्यान, घटनास्थळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासह शहरातील व परिसरातील पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना देत त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. महापौर स्वाती यवलुजे, खा. धनंजय महाडिक, आ. सतेज पाटील, आ. राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. पाटील, उपअभियंता उगले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार, गटनेता शारंगधर देशमुख, नगरसेवक सत्यजित कदम, ऋतुराज पाटील यांच्यासह महापालिका नगरसेवक मोठ्या संख्येने शिवाजी पूल आणि सीपीआरमध्ये दाखल झाले.

पाण्यात पूर्ण बुडालेल्या गाडीला बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आल्या. रात्री दीडच्या सुमारास दोन क्रेन शिवाजी पुलावर दाखल झाल्या. त्यापाठोपाठ शिरोली एमआयडीसीकडून अधिक क्षमतेच्या दोन के्रन मागवण्यात आल्या. पुलावर दाखल झालेल्या क्रेनच्या सहाय्याने पाण्यातील गाडी बाहेर काढण्याचा रात्री 2 वाजून 10 मिनिटांनी प्रयत्न सुरू केला. या के्रनने गाडी पाण्याबाहेर काढण्यात आली. मात्र, ती वर घेता येत नव्हती. गाडीतील मृतदेहही बाहेर काढणे शक्य होत नव्हते. काही काळ प्रयत्न करण्यात आला. मात्र, मोठ्या के्रनद्वारे गाडी वर घेऊन नंतरच मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

मोठ्या क्रेनच्या मदतीनेगाडी बाहेर काढली
रात्री अडीचच्या सुमारास मोठ्या क्रेनची मदत घेण्यात आली. यानंतर रात्री सव्वातीनच्या सुमारास या के्रनद्वारे ही गाडी शिवाजी पुलावर घेण्यात आली. गाडी पाण्याबाहेर काढताच अनेकांच्या अंगावर शहारे आले, इतकी भयानक अवस्था गाडीची झाली होती. संतोष वरखडे यांचा मृतदेह गाडीत अर्धवट अवस्थेत लोंबकळत होता. तर एक मृतदेह गाडी वर घेताना अर्ध्यातून पुन्हा पाण्यात पडला. अग्‍निशमन दल, व्हाईट आर्मी व जीवन ज्योतीच्या जवानांनी गाडीतील एकेक असे सात मृतदेह बाहेर काढले.

गाडीतील सात आणि पाण्यातील एक असे एकूण आठ मृतदेह आणि त्यापूर्वी काढलेले तिघा जखमींसह सात असा आकडा पंधरापर्यंत गेला. यावेळी नऊ महिन्यांचा सानिध्य मिळत नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर नदीपात्रात पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, गाडीतून काढलेले संतोष वरखेडे, सचिन केदारी, नीलम केदारी, भावना केदारी, श्रावणी केदारी, संस्कृती केदारी, छाया नांगरे, प्रतीक नांगरे व चालक यांचे मृतदेह सीपीआरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

नातेवाईकांचा आक्रोश
या अपघाताची माहिती मिळताच नीलम केदारी यांचा भाऊ, चुलतभाऊ व अन्य नातेवाईक साडेचारच्या सुमारास सीपीआर रुग्णालयात पोहोचले. त्यापाठोपाठ काही वेळातच भरत केदारी, त्यांचा मुलगा दिलीप केदारी हे अन्य नातेवाईकांसह सीपीआरमध्ये पोहोचले. एकाच कुटुंबातील चिमुरड्यांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला. त्यांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज गोठवणाराच होता.  दरम्यान, सकाळी साडेसहा वाजता पाणबुड्या उदय निंबाळकर यांनी नऊ महिन्याच्या सानिध्यचा मृतदेह शोधला. पुलाच्या कमानीखाली  बुड्या मारून त्यांनी हा मृतदेह बाहेर काढला.

मृतदेह, जखमी पुण्याकडे रवाना
पुण्याहून आलेल्या नातेवाईकांनी जखमींची भेट घेऊन त्यांना धीर दिला. यानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी मृतदेहांसह जखमींनाही पुण्याकडे नेण्यात आले. दरम्यान, या अपघाताची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

केदारी कुटुंबावर काळाचा भीषण घाला
या अपघातात भरत केदारी यांच्या कुटुंबातील बारा जणांवर काळाचा घाला कोसळला. त्यांचा एक मुलगा, त्याची पत्नी व त्यांची दोन मुले, एक सून आणि तिची दोन मुले, एक मुलगी आणि तिचा एक मुलगा, दुसर्‍या मुलगीचा पती आणि तिच्या दोन मुली अशा 12 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. केदारी यांच्या कुटुंबात आता भरत केदारी, त्यांचा एक मुलगा दिलीप आणि पत्नी मंदा हे तीनच लोक राहिले आहेत. माझे संपूर्ण कुटुंबच संपले, आता मी तरी जगून काय करू, अशी भावना व्यक्‍त करत 57 वर्षीय वारकरी पंथांतील भरत केदारी यांचा सुरू असलेला आक्रोश उपस्थितांनाही अश्रू अनावर करणारा होता.

सायंकाळी खुशालीचा आणि रात्री अपघाताचा फोन
सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास आपण मुलगा सचिनशी बोललो. गणपतीपुळ्यातून आता बाहेर पडतोय, कोल्हापूरला जातोय, असे सांगत आम्ही सर्व जण सुखरूप आहोत, असे त्याने सांगितले. सायंकाळी बाहेर पडण्याऐवजी उद्या सकाळी बाहेर पडा, असे आपण त्याला सांगितले. मात्र, कोल्हापुरात मुक्‍काम करू, असे सांगत त्याने फोन ठेवला. यानंतर रात्री एकच्या सुमारास अपघाताची माहिती देणारा फोन आला. सायंकाळी खुशालीचा, तर रात्री अपघाताचा फोन आल्याचे भरत केदारी यांनी सांगितले.

अपघातग्रस्तांचे साहित्य पडूनच
अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून जखमी व मृतांना सीपीआरकडे हलविले जात होते. याचवेळी मिळेल ते साहित्यदेखील सोबत पाठविले जात होते. सीपीआरच्या अपघात विभागाबाहेर व शवविच्छेदन विभागाबाहेर अपघातग्रस्तांचे साहित्य पडून होते.
 

Back to top button