उपचारांपासून कोणीही वंचित राहणार नाही | पुढारी

उपचारांपासून कोणीही वंचित राहणार नाही

कोल्हापूर : प्रतिनिधी

हृदयरोगाशी संबंधित 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची 2 डी ईको व हृदय रोग तपासणीचे मोफत आरोग्य शिबिर होत असून यामधील सदोष रुग्णांवर (बालकांवर) गरजेनुसार मुंबई येथील नामवंत हॉस्पिटलमध्ये तसेच सी.पी.आर. हॉस्पिटल कोल्हापूर येथे मुख्यमंत्री सहायता निधीमधून पूर्णपणे मोफत पुढील उपचार करण्यात येणार आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही गरजवंत उपचारापासून वंचित राहणार नाही. यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक व धर्मादाय आयुक्‍त कार्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर, ऑडिटोरियम हॉल येथे 2 डी ईको शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, वैद्यकीय सहायता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे, धर्मादाय सहआयुक्‍त श्रीमती निवेदिता पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, सहायक धर्मादाय आयुक्‍त आर. जी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव,  संदीप देसाई, डॉ. शिशिर मिरगुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक गरजवंताला वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी यासाठी महाराणी ताराराणी पुतळ्याजवळ असणार्‍या कावळा नाका सर्किट हाऊसमधील आपल्या कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रत्येकाला मदत मिळेल यासाठी कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. शासनानेही आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. नामांकित हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी बेड उपलब्ध ठेवणे बंधनकारक केले आहे. सी.पी.आर.मध्ये होत असलेल्या या शिबिरामधून 2 डी ईको व हृदय रोग तपासणी शिबिरामधून ज्या रुग्णांना मुंबई, पुणे येथे उपचार होणे आवश्यक आहे, त्यांना रुग्णांसोबत राहणार्‍या नातेवाईकांच्या राहण्याच्या खर्चासह सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येईल. 

मुख्यमंत्री, वैद्यकीय सहायता कक्ष तथा विशेष कार्य अधिकारी कक्षप्रमुख ओमप्रकाश शेटे म्हणाले, पैशाअभावी उपचार न मिळणे हे अत्यंत दुखदायक असून असे होऊ नये यासाठी मुख्यमंत्री, वैद्यकीय सहायता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. पूर्वी 25 हजार रुपये असणार्‍या वैद्यकीय मदतीच्या रकमेत वाढ करून दीड लाखापर्यंत करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते. या कक्षाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे साडेसहाशे कोटी रुपयांचे काम गेल्या तीन वर्षांत झाले आहे. परमनंट डायग्‍नोसीस कॅम्प सातत्याने घेत राहिल्यास व त्यांची संख्या मर्यादित ठेवल्यास चांगले व दर्जेदार उपचार मिळून रुग्णांना त्याचा निश्‍चितपणे फायदा मिळतो. 

डॉ. कुणाल खेमनार म्हणाले,  राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची कामगिरी राज्यात पहिल्या क्रमांकाची आहे. गतवर्षी 1070 पैकी 1057 मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये 197 पैकी 97 मुलांवर हृदयरोगाच्या शस्त्रक्रिया झाल्या. अशा प्रकारच्या शिबिरांमधून दुर्धर आजार असणार्‍या मुलांना उपचार उपलब्ध होऊन ते बरे होतात.

कार्यक्रमामध्ये स्वागत डॉ. रामानंद यांनी केले. प्रास्ताविक डॉ. एल. एस. पाटील यांनी केले. आभार आर. जी. चव्हाण यांनी मानले. यावेळी मुंबई एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल विशेष तज्ज्ञ डॉ. दीपक किशनचंद चंदवाणी व त्यांची टीम, डॉ. अभयकुमार साळुंखे, बंटी सावंत, विजय जाधव, डॉ. विलास देशमुख यांच्यासह शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Back to top button