चोकाक तलाठ्यासह दोघांना 5 हजारांची लाच घेताना अटक | पुढारी

चोकाक तलाठ्यासह दोघांना 5 हजारांची लाच घेताना अटक

इचलकरंजी : प्रतिनिधी

सातबारा पत्रकावर नोंद करून उतारा देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी चोकाकचा तलाठी राजेश आप्पासो माळी आणि नितीन दादासो कांबळे या दोघांना लाचलुचपत खात्याने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी पोवार गल्ली येथे राजेश माळी याच्या भावाच्या घरी करण्यात आली.

तक्रारदाराच्या मामाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यांच्या नावावर असलेल्या गट नंबर 193, 220, 223, 227, 237, 414/क या जमिनीवर वारसदार म्हणून नोंद घालण्यासाठी माळी याने तक्रारदाराकडे पैसे मागितले. गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी माळी याने तक्रारदारास फोन करून हेरले येथील बसस्थानकावर बोलवून घेतले. सातबारा पत्रकावर नोंद घालण्यासाठी माळी याने तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांची लाच मागितली.

त्यातली पहिला हप्‍ता पाच हजार रुपयांची मागणी केली. यावेळी माळी याच्यासोबत नितीन कांबळे हाही उपस्थित होता. माळी याने लाच मागितल्याने तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत खात्याकडे राजेश माळी आणि खासगी इसमाविरोधात तक्रार केली. तक्रारीनुसार लाचलुचपत पथकाने पडताळणी केली. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. माळी याने तक्रारदाराकडून मागितलेली पाच हजारांची रक्‍कम पोवार गल्ली येथील भावाच्या घरी देण्यास सांगितले.

त्यानुसार तक्रारदारासोबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी होते. माळी याने पाच हजारांची लाच स्वीकारत असताना पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर माळी व कांबळे याला शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलिस उपायुक्‍त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्या पथकाने केली.

Back to top button