समीर, तावडेवरील दोषारोप निश्‍चिती लांबणीवर | पुढारी

समीर, तावडेवरील दोषारोप निश्‍चिती लांबणीवर

कोल्हापूर : प्रतिनिधी

कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यातील आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे, समीर गायकवाडवरील दोषारोप निश्‍चितीची प्रक्रिया सोमवारी होऊ शकली नाही. सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आली आहे. 17 मार्चला त्यावर सुनावणी होईल, असे अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश (2) एल. डी. बिले यांनी सांगितले.

कॉ. पानसरे खून खटल्यातील आरोपी तावडेसह गायकवाडवरील दोषारोप निश्‍चितीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 7 मार्च 2018 रोजी त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या आदेशामुळे 17 मार्चला सुनावणी होईल, असे सांगण्यात आले. 

सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर तपास पथकातील अधिकार्‍यांसह आरोपीचे वकील समीर पटवर्धन, कॉ. दिलीप पवार आदी उपस्थित होते. डॉ. तावडेेचा सशर्त जामीन अर्ज मंजूर करताना अतिरिक्‍त सत्र न्यायालयाने त्यांचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी ‘सीबीआय’ने डॉ. तावडेला अटक करून त्याचा पासपोर्ट यापूर्वीच ताब्यात घेतला आहे. पासपोर्ट जप्तीच्या पंचनाम्याची कागदपत्रेही अ‍ॅड. पटवर्धन यांनी आज न्यायालयाला सादर केली.

Back to top button