…अन् दिव्यांग बांधवांचे चेहरे खुलले! | पुढारी

...अन् दिव्यांग बांधवांचे चेहरे खुलले!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा गेल्या सव्वा वर्षापासून कोरोनाची अनामिक भीती बाळगून जगताना, त्यापासून संरक्षण करणारी लस आम्हाला कधी मिळेल, लस घेण्यासाठी केंद्रापर्यंत जाता तरी येईल का, गेलो तरी लस मिळेल का, अशा नानाविध प्रश्नांनी दररोज चेहर्‍यावरचा ताण वाढत होता. मात्र, शुक्रवारी हा ताण पूर्ण कमी झाला आणि अंध, दिव्यांगांचे चेहरे खुलले. निमित्त ठरले लसीकरणाचे.  शुक्रवारी अंध, दिव्यांगांचे लसीकरण सुरू झाले आणि तेही जागेवर. ही संधी उपलब्ध झाली ती दै. ‘पुढारी’च्या पुढारी रीलिफ फाऊंडेशन आणि कोल्हापूर महापालिकेच्या संयुक्त दिव्यांग लसीकरण मोहिमेमुळे. शाहूपुरीतील नॅबच्या कार्यालयात लसीकरण करण्यात आले. यापुढे ही मोहीम आता अधिक वेगाने शहरात राबविली जाणार आहे. अंध, दिव्यांगाना त्यांच्या घरापर्यंत जाऊन कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात अंकविक्रेते आणि पत्रकारांचे लसीकरण केले जाणार आहे.

भूंकप असो, की महापूर. वैद्यकीय सुविधांची गरज असो वा लोकलढ्याला पाठबळ असो. जिथे जिथे सर्वसामान्य नागरिकांना अडचणी आल्या, तिथे तिथे दैनिक ‘पुढारी’ त्यांच्या मदतीला धावून गेला. निरपेक्ष पत्रकारितेचा वसा आणि वारसा जपणार्‍या ‘पुढारी’ने कोरोना महामारीतही फ्रंटलाईन वर्कसची भूमिका घेतली. कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण हेच प्रभावी अस्त्र असल्याने अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, त्यातूनच महापालिकेच्या सहकार्यातून अंध, दिव्यांगांचे लसीकरण करण्याचे अभियान हाती घेतले आहे.

या अभियानाचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला. लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर जाऊन रांगेत उभे राहण्याची दिव्यांगांना आता गरज भासणार नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र केंद्रांवर तसेच ज्यांना घराबाहेरच पडता येत नाही, त्यांना त्यांच्या घराजवळ जाऊन लस देण्याची सुविधा या अभियानाद्वारे केली आहे.

अंधांना किटचे वाटप

लसीकरण झाल्यानंतर अंध नागरिकांना ‘नॅब’च्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. शहरातील सर्व अंध नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन असल्याचे ‘नॅब’चे अध्यक्ष डॉ. मुरलीधर डोंगरे यांनी सांगितले. यावेळी लसीकरणासाठी आलेल्या अंध, दिव्यांगांसाठी करमणुकीचाही कार्यक्रम सादर करण्यात आला. प्रशांत पाटील, ऋचा गावंदे, सुरज नाईक, संदेश गावंदे यांनी सादरीकरण केले.

सुसज्ज यंत्रणा

लसीकरणस्थळी नोंदणी, बेड, आवश्यक औषधे, वैद्यकीय पथक आदी यंत्रणा सुसज्ज होती. यासह सिद्धिविनायक नर्सिंग होम येथे तीन आयसीयू बेड राखीव ठेवण्यात आले होते. 

जयेश ओसवाल यांच्याकडून ‘सॅनिटायझर’चे वाटप

जयेश ओसवाल यांच्याकडून अंध व दिव्यांगांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. दैनिक ‘पुढारी’च्या वतीने राबविण्यात येणारा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. यामुळेच या उपक्रमात सहभागी होत ‘सॅनिटायझर’चे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाशी लढण्याचे ‘पुढारी’मुळे बळ मिळाले

लस कशी मिळेल, यासाठी दोन-तीन महिने वाट पाहत होतो; पण लस मिळत नव्हती. आज लस घेतोय, लसीकरणात सहभागी होतोय हे केवळ ‘पुढारी’मुळे शक्य झाले. यामुळे आता कोरोनाविरोधात लढण्याचे बळ मिळाले, अशा भावना लसीकरणानंतर दिव्यांगांनी व्यक्त केल्या. यावेळी हेल्पर्सच्या मुख्याधिकारी भाग्यश्री पाटील, वसतिगृहप्रमुख रेखा देसाई, तानाजी देसाई, ‘नॅब’चे सुनील नागराळे, शिवानंद पिसे, ज्याोती सावंत, डॉ. बी.एम.पुणंदीकर, परिचारिका सायली रणदिवे, शुभांगी हसबनीस आदी उपस्थित होते.

टाळ्या वाजवत व्यक्त केली कृतज्ञता

लसीकरण पूर्ण झाल्यानंतर हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्डचे सर्व विद्यार्थी बसमधून वसतिगृहाकडे परतले. लसीकरण केंद्रातून परतताना सर्वांनी टाळ्या वाजवत दैनिक ‘पुढारी’विषयी कृतज्ञता व्यक्त केली. 

आई-मुलाच्या चेहर्‍यावर तराळले समाधानाचे भाव

मुलगा दिव्यांग, आई विधवा. हातावरचे पोट असलेल्या त्या माऊलीला मुलाला लस द्यायची कोठे, असा प्रश्न सतत सतावत होता. ‘पुढारी’च्या उपक्रमामुळे त्या माऊलीला दिलासा मिळाला. चिखली (ता. करवीर) येथून रिक्षा करून आलेल्या महिलेल्या दिव्यांग मुलावर रिक्षातच डॉक्टरांनी यशस्वी लस दिली. त्यावेळी दोघांच्याही चेहर्‍यावर समाधानाचे भाव तराळले. एका दिव्यांगाला उठताही येत नाही, त्यातच त्याची प्लास्टिक सर्जरी झालेली. त्या दिव्यांगालाही डॉक्टरांनी रुग्णवाहिकेत लस दिली.

…अन् दिव्यांग गहिवरले

लसीकरणासाठी आलेल्या दिव्यांगांची दै.‘पुढारी’ परिवाराकडून काळजी घेतली जात होती. अनेकजण बसमधून खाली उतरूही शकत नव्हते. त्यांची व्हीलचेअर उतरून घेणे, लसीकरण झाल्यानंतर त्यांना पुन्हा बसमध्ये बसविण्याचे काम दै.‘पुढारी’ परिवाराकडून केेले जात होते. आमचे लसीकरण होणार की नाही, याचीच खात्री नव्हती, तिथे दै.‘पुढारी’ने आमच्या लसीकरणाची काळजी घेत ते तडीस तर नेलेच; पण त्याचबरोबर आमची संपूर्ण काळजी घेतली, असे सांगत अनेक दिव्यांगांना अक्षरश: गहिवरून आले. सर्वसामान्यांशी दै. ‘पुढारी’चे असलेले आपुलकीचे नाते यानिमित्ताने आणखी दृढ झाले.

फिरती रुग्णवाहिका दिव्यांगांपर्यंत जाणार

या अभियानात सिद्धिविनायक नर्सिंग होमच्या फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे ज्या दिव्यांगांना लसीकरणासाठी या केंद्रांपर्यंतही येता येणार नाही, त्यांच्या घराजवळ जाऊन त्यांचे लसीकरण केले जाणार आहे.

ज्यावेळी जिल्ह्यातील लोक अडचणीत असतात, त्यातून त्यांना बाहेर काढण्याचे काम दै.‘पुढारी’ करत आला आहे. प्रत्येकाला न्याय देत आला आहे. दिव्यांगांसाठी लसीकरण सुरू करून दै.‘पुढारी’ चांगले काम करत आहे, यापुढेही असेच काम होत राहील, यात शंका नाही.

ऋतुराज पाटील, आमदार


दिव्यांग बांधवांसाठी लसीकरण ही मोठी जबाबदारी होती. त्याला दै. ‘पुढारी’ने प्राधान्य दिले. या घटकांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला. दै.‘पुढारी’ आणि महापालिकेने केलेल्या या लसीकरणाचा सर्व दिव्यांगांना लाभ होईल.

डॉ. कादंबरी बलकवडे,

प्रशासक, महापालिका


कोल्हापूर जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे. दिव्यांगांच्या लसीकरणाचाही प्रश्न होता. या वंचित घटकाच्या लसीकरणासाठी दै. ‘पुढारी’ने घेतलेल्या भूमिकेने जिल्ह्यातील लसीकरणाला आणखी वेग येईल.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी 


आम्ही तुमच्या सोबत आहोत…


हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्डचे 40 विद्यार्थी लसीकरणासाठी आले होते. अनेकांना तर बसमधून खालीही उतरता येत नव्हते. या सर्वांची जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बसमध्ये जाऊन भेट घेतली. ‘काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दै. ‘पुढारी’आणि जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेचे स्वागत केले. 



 

Back to top button