कोण आहेत संजय नहार? | पुढारी | पुढारी

कोण आहेत संजय नहार? | पुढारी

पुणे : नरेंद्र साठे 

पुण्यातील सरहद संस्थेचे संजय नहार यांना लेटरबॉम्ब पाठवण्याचा प्रयत्न झाला आहे. नगर शहरातच कुरियरच्या ऑफिसमध्ये या बॉम्बचा स्फोट झाला. पण, संजर नहार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न कोण करेल? अनेकांना नहार यांच्या सामाजिक कामाची कल्पना नाही. त्यांच्या कामाविषयी अनेकांना माहिती नाही. अनेकांच्या मनात त्यांच्या कामाविषयी गैरसमज आहेत. त्यामुळे हे संजय नहार आहेत तरी कोण? आणि ते करतात काय? हे सांगण्याचा पुढारी ऑनलाईनने प्रयत्न केला आहे. 

संजय नहार यांनी पुण्यात काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी संस्था सुरू केली. सरहद असे या संस्थेचे नाव आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांततेचा संदेश देत सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली. काश्मीरमधील दहशतीच्या वातावरणात होरपेळलेली मुले-मुली या संस्थेत आणली जातात. त्यांना मोफत शिक्षण, शुल्क माफ करणे, राहण्याची सोय, जेवणाची सोय नहार यांनी उपलब्ध करून दिली आहे. पुण्यातील कात्रजमध्ये या शैक्षणिक संस्थांचे काम चालते .

वंदे मातरम् संस्थेची स्थापना…

राष्ट्रीय एकात्मतेच्या जनजागृतीसाठी 1984 मध्ये वंदे मातरम या सामाजिक संस्थेची नहार यांनी स्थापना केली. नंतर या संस्थेचे नाव सरहद असे करण्यात आले. त्यांनी चिनार पब्लिकेशन ही प्रकाशन संस्था सुरू केली. आंतरराष्ट्रीय संबंध, पाकिस्तान संबंधी अनेक पुस्तके त्यांनी या प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित केली.

1990 च्या दशकात पंजाब, जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात सामाजिक कामाला त्यांनी सुरुवात केली. पंजाब येथील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी देखील नहार यांनी काम केले. तेथील महाविद्यालयीन युवक-युवतींना आश्रय देण्याचे काम त्यांनी केले. ईशान्य भारतात दहशतवादी हल्ले झाले. तेथील स्थानिक नागरिकांना मदत करण्यात ते अग्रेसर होते. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. 

पुण्यात काश्मीर महोत्सव….

विचारांच्या देवाण-घेवाणीसाठी सरहदच्या माध्यमातून 1997मध्ये नहार यांनी काश्मीर महोत्सव सुरू केला. या महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामध्ये अनेक नामवंत गायक-वादक, लेखकांना आपली कला सादर करता आली. काश्मिरी संस्कृती पुणेकरांना समजून घेता आली तर काश्मिरी नागरिकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख यानिमित्ताने होत आहे. या महोत्सवात साहित्य, संगीत, नाटक, नृत्य अशा कलांना वाव मिळतो. या माध्यमातून एकमेकांतील नाते दृढ करता येऊ शकते असा नहारांचा विश्‍वास आहे. नहार यांनी प्रत्येक पातळीवर काश्मीरमधील बारकावे टिपून त्यामध्ये महाराष्ट्राशी नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सांस्कृतिक चळवळ उभी करण्यासाठी सहरद पहिल्यापासून प्रयत्नशील आहेत. कारगिलमध्ये मुक्कामाच्या चांगल्या सुविधा असाव्यात. तिथला इतिहास सांगणारी, शौर्यगाथा सांगणारी वेगवेगळी संग्रहालयेही असण्यासाठी सरहद संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

सीमावर्ती भागातील युवकांना मुख्य प्रवाहात आणले…

सीमाभागातील नागरिकांशी मैत्रीचे नाते तयार व्हावे, आपुलकी निर्माण व्हावी यासाठी सरहदकडून प्रयत्न केले गेले. सीमावर्ती भागातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्थेच्यावतीने काम करण्याचे निश्‍चित करण्यात आले आणि त्यानुसार काम सुरू आहे. अगदी सुरूवातीच्या काळात काश्मिरमधून पुण्यात 150 मुलांना आणण्यात आले, त्यांना वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन देण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत युवक-युवती पुण्यात आणण्याचा आलेख वाढता आहे. 

वाचा : नगर बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसकडे

वाचा : नगरमध्ये क्रूड बॉम्बचा स्फोट

वाचा : पार्सल पडले आणि बॉम्ब अहमदनगरमध्येच फुटला

 

Tags : sanjay nahar, pune, pune news, kashmiri youth, letter bomb  

Back to top button