राजर्षी शाहूंचे लोककार्य नव्या रूपात | पुढारी

राजर्षी शाहूंचे लोककार्य नव्या रूपात

कोल्हापूर : सागर यादव 

‘हिरे माणके-सोने उधळा, जय-जयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुजला हा मुजरा…,’ असे गौरवगीत ऐेकताक्षणीच प्रत्येक कोल्हापूरकरांची छाती अभिमानाने फुलते. अपोआपच त्यांचे हात लोकराजाला मानाचा मुजरा करण्यासाठी सज्ज होतात. अशा या राजाच्या दूरद‍ृष्टीच्या लोककार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर पुराभिलेखागाराच्या वतीने नूतन वर्षातील नवा संकल्प केला आहे. 

सन 1988 ला प्रकाशित करण्यात आलेल्या ‘राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश’ या ग्रंथाच्या पुनर्प्रकाशनास  राज्य शासनाच्या पुराभिलेखागार विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ग्रंथाच्या पुनर्निर्मितीचे काम सुरू झाले आहे. येत्या सहा महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्ण करून राजर्षी शाहू जयंती (26 जून) 2020 या दिवशी या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन करण्याचा मानस आहे. 

‘राजर्षी शाहू छत्रपतींचे निवडक आदेश’ भाग-1 व भाग-2 या दोन पुस्तकांची निमिर्र्ती 30 वर्षांपूर्वी कोल्हापूर पुराभिलेखागाराने केली होती. अवघ्या 48 वर्षांच्या अल्पआयुष्यात राजर्षी शाहू महाराज यांनी केलेल्या दूरद‍ृष्टीच्या आणि लोकोपयोगी कार्याची माहिती देणार्‍या आदेशांची माहिती तारखेसह प्रसिद्ध करण्यात आली होती. ‘कोल्हापूर दप्‍तरातील ऐतिहासिक वेचे’ या संकल्पनेंतर्गत या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली होती. या आदेशांचे संकलन कोल्हापूर पुराभिलेखागाराचे अधीक्षक शामराव पाटील यांनी केले आहे. तत्कालीन संचालक भास्कर धाटावकर यांनी या ग्रंथांचे संपादन केले होते. यात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, भुतदया, जलव्यवस्थापन,  राजकीय, धार्मिक, औद्योगिक, कायदा व सुव्यवस्था, कृषी, पर्यावरण,  क्रीडा, दलितोद्धार, न्यायदान, प्रशासकीय, बांधकाम, लष्करी, व्यापार, सहकार, सांस्कृतिक, साहित्य, संकीर्ण यासह विविध विषयांवर आधारित आदेशांचा समावेश होता. 

कालओघात हे पुस्तक आऊट ऑफ प्रिंट झाले. यामुळे शाहूप्रेमी नागरिकांसह इतिहास अभ्यासक, संशोधक, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून या  पुस्तकाची सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार कोल्हापूर पुरालेखागाराने मुंबई पुराभिलेखागाराकडे याबाबत पाठपुरावा केला.  संचालक सुजितकुमार उगले यांनी विशेष सूचना देऊन नव्या रूपात हा ग्रंथ पुनप्रर्काशित करण्यास मंजुरी दिली. नव्याने प्रकाशित होणार्‍या ग्रंथात राजर्षी शाहूंनी आपल्या कारकिर्दीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व दिलेल्या आदेशांचा समावेश असणार आहे. सुमारे  100 ते 125 नव्या आदेशांचा यात समावेश असणार आहे. सहायक संचालक बा. ना. कुंडले, अभिलेखापाल गणेशकुमार खोडके व त्यांचे सहकारी ’राजर्षी शाहू  छत्रपतींचे निवडक आदेश’ या ग्रंथांच्या निर्मीती कार्यांत गुंतले आहेत. 

Back to top button