संत, वारकर्‍यांची भूमिका समाज जोडणारी | पुढारी

संत, वारकर्‍यांची भूमिका समाज जोडणारी

कोल्हापूर : प्रतिनिधी

संत आणि वारकर्‍यांनी समाजातील जातीव्यवस्था, विषमता मिटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. संत, वारकर्‍यांची भूमिका शांतता व समता प्रस्थापित करून समाजाला जोडणारी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. 

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन सांगता समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंत्री आठवले म्हणाले, संतांनी मोठे काम केले आहे. आजही त्यांचा प्रभाव जनमानसावर आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला जाणार्‍या भक्‍तांची संख्या मोठी आहे. राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चांगले संबंध होते. शाहू महाराजांमुळे बर्‍याच गोष्टी करणे शक्य झाले. डॉ. आंबेडकर संतांच्या भूमिकेला पाठिंबा देणारे होते. 

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणाले, समाजात होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संतांनी केले. संतांनी समाज सुधारणेची पार्श्‍वभूमी तयार केल्यानेच महाराष्ट्रात 19 व 20 व्या शतकात समाजसुधारक तयार झाले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संत तुकारामांचा प्रभाव होता. संतांच्या विचारांचा वारसा आधुनिक पद्धतीने समाजापुढे आणण्याची गरज आहे.      

आ. विनय कोरे म्हणाले, एकमेकांना मदत करून प्रगतीकडे जाणे ही संतांची शिकवण आहे. त्याप्रमाणे प्रत्येकाने आचरण करावे. महापालिका आयुक्‍त डॉ. मल्‍लिनाथ कलशेट्टी म्हणाले, वारकरी संप्रदायाशी संबंध आल्याने चांगल्या गोष्टी शिकता आल्या. पंढरपूरच्या वारीत स्वच्छता मोहीम राबवू शकलो. जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, वारकरी होणे कठीण आहे. प्रशासनाच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण अभ्यासाद्वारे संत साहित्य, शिकवण देण्याचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार आहे. 

याप्रसंगी वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी डॉ. सदानंद मोरे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात आला. तात्यासाहेब कोरे यांना मरणोत्तर वारकरी विठ्ठल पुरस्कार व उत्कृष्ट महिला कीर्तनकार म्हणून बीडच्या उषा कांबळे यांना गौरविण्यात आले. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेबद्दल बाळासाहेब महाराज चोपदार यांना चारचाकी गाडी प्रदान करण्यात आली. 

प्रा. मीरा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले. यावेळी भगवान महाराज हांडे, निवृत्ती महाराज नामदास, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, भाऊसाहेब महाराज पाटील, बाबा महाराज राशिनकर, बापूसाहेब महाराज देहूकर, रामकृष्ण महाराज लहवीतकर, श्रीकांत महाराज ठाकूर, नरहरी महाराज चौधरी, भानुदास महाराज यादव, संमेलनाध्यक्ष अमृत महाराज जोशी उपस्थित होते.

Back to top button