निर्दयी उद्योजकाने चार दिवस उपाशी ठेवून १७ कामगारांना सोडले कर्नाटकाच्या हद्दीत | पुढारी

निर्दयी उद्योजकाने चार दिवस उपाशी ठेवून १७ कामगारांना सोडले कर्नाटकाच्या हद्दीत

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना व्याप्ती वाढत असताना गोवा येथील एका व्यावसायिकाने त्याच्या शिपयार्डमध्ये काम करणाऱ्या १७ कामगारांना कामावरून काढत या सर्वांना खानापूर तालुक्यात कर्नाटकाच्या हद्दीत आणून सोडले आहे. हे सर्व मजूर बिदर आणि हुमनाबाद येथील असून व्यवसायिकाच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. लॉकडाऊनमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात लोकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातलेली आहे. बिदर आणि या जिल्ह्यातील हुमनाबाद येथील काही मजूर गोवा येथे शिपयार्डवर कामासाठी गेले होते. लॉकडाऊनमुळे तेथील त्यांचे काम बंद झाले आहे. परंतु, अशा काळात तेथील शिपयार्ड मालकाने त्यांना सांभाळून घेणे गरजेचे होते. परंतु, त्यांना गेल्या चार दिवसांपासून जेवणदेखील दिले नाही. शिवाय शुक्रवारी या सर्वांना एका वाहनात बसवून त्यांना गोवा हद्दीच्याबाहेर कर्नाटकाच्या हद्दीत सोडण्यात आले. हे सर्व मजूर खानापूर तालुक्यातून चालत बेळगावकडे येत होते. 

वाचा – लॉकडाऊनमध्ये हायटेक पद्धतीने दारु विकणाऱ्या बारमालकाला पोलिसांचा दणका!

यावेळी भाजीपाला घेऊन गेलेली काही वाहने बेळगावला परतत असताना त्यांचे या मजुरांकडे लक्ष गेले. त्यांनी वाहन थांबवून विचारपूस केली असता ते गोव्याहून आल्याचे सांगितले. या सर्वांना वाहनात बसवून बेळगावात आणले. येथे आल्यानंतर वाहनचालकाने सतर्कता दाखवत याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली प्रशासनाने या सर्वांना आधी अशोकनगर येथे नेले. यानंतर बीम्स व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यांना उपचारासाठी येथे दाखल केले आहे. त्यांच्यात कोरोनाची काही लक्षणे आहेत की नाही हे तपासणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. ही तपासणी आता सुरू असून दोन दिवसानंतर याबाबतची माहिती देण्यात येईल, असे बीम्सचे संचालक व्ही दस्तीकोप्प कोप यांनी सांगितले.

विरार : पायी चालत घर गाठत असणाऱ्या मजुरांना वाहनाची धडक; पाच जण ठार 

या मजुरांना विचारले, तेव्हा त्यांनी आपल्याला गोवा सरकारने हाकलले आहे असे ते सांगत होते.  या मजुरांना गोव्यातून हाकलून लावण्याचे कृत्य या उद्योजकाचे आहे की तेथील सरकारचे त्यांना राज्याबाहेर हाकलून दिले आहे, हे अद्याप स्पष्ट नसून याबाबत माहिती घेणे सुरू असल्याचर येथील प्रशासनाने सांगितले.

Back to top button