INDvsSA : KL Rahul आफ्रिकेत शतक झळकावणारा दुसरा भारतीय ओपनर! | पुढारी

INDvsSA : KL Rahul आफ्रिकेत शतक झळकावणारा दुसरा भारतीय ओपनर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsSA Test :टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ विकेट गमावून २७२ धावा केल्या आहेत. सलामीवीर केएल राहुल १२२ आणि अजिंक्य रहाणे ४० धावांवर नाबाद आहेत. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी १३० चेंडूत ७३ धावांची भागीदारी झाली आहे. द.आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीला तीन विकेट्स घेण्यात यश आले. दरम्यान, पहिल्या कसोटीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणेचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. तर न्यूझीलंडविरुद्ध दमदार कसोटी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांना संघाबाहेर ठेवण्यात आले.

रहाणे-राहुल यांच्यात अर्धशतकी भागीदारी…

भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 250 धावांच्या पुढे गेली आहे. केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली आहे. मयंक अग्रवाल 60, चेतेश्वर पुजारा 0 आणि विराट कोहली 35 धावा करून बाद झाले आहेत.

केएल राहुलचा नादखुळा….

भारतीय सलामीवीर केएल राहुलने शानदार फलंदाजी करताना २१७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीतील ७ वे शतक आहे. तर आफ्रिकन संघाविरुद्धचे पहिले शतक आहे. परदेशी भूमीवर राहुलचे हे सहावे शतक आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत यजमान संघाविरुद्ध शतक झळकावणारा तो दुसरा सलामीवीर ठरला आहे. याआधी वसीम जाफरने २००७ मध्ये ११६ धावा केल्या होत्या. यंदाच्या इंग्लंड दौऱ्यावरही राहुलने लॉर्ड्सवर १२९ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली होती. राहुलची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या १९९ आहे, जी त्याने इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत केली होती.

दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा राहुल हा १० वा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, प्रवीण अमरे, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, वसीम जाफर, कपिल देव, चेतेश्वर पुजारा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी आफ्रिकेत शतके झळकावली आहेत. सचिनच्या नावावर सर्वाधिक पाच शतके आहेत, तर कोहलीने दोनदा ही कामगिरी केली आहे. या दोघांशिवाय उर्वरित फलंदाजांच्या नावावर केवळ एकच शतक आहे.

विराट कोहली बाद…

भारताची धावसंख्या १९९ असताना भारताला तिसरा धक्का बसला. कर्णधार विराट कोहली ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला पहिल्या स्लिपमध्ये मुल्डरने लुंगी एनगिडीने झेलबाद केले. विराट आऊट होण्यापूर्वी गुड टचमध्ये दिसत होता. त्याने ९४ चेंडूही खेळले. तो मोठी धावसंख्या करेल अशी शक्यता होती. पण स्वस्तात बाद झाला. विराट आणि राहुलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १७१ चेंडूत ८२ धावांची भागीदारी झाली.

चहापानापर्यंत भारताची धावसंख्या १५७/२

चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने २ गडी गमावून १५७ धावा केल्या होत्या. विराट कोहली १९ आणि राहुल ६८ धावांवर खेळत होते. पहिल्या सत्रात पिछाडीवर पडल्यानंतर आफ्रिकेने दुसऱ्या सत्रात दमदार पुनरागमन करत ११७ धावांवर दोन गडी बाद केले. एनगिडीच्या दोन चांगल्या चेंडूंनी आफ्रिकेला सामन्यात परतण्यास मदत केली. पुजारा पुन्हा एकदा फ्लॉप झाला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. दोन धक्क्यांनंतर राहुलने विराटसह भारताचा डाव सांभाळला आणि चहापानाच्या वेळेपर्यंत विकेट गमावली नाही.

भारताची धावसंख्या १५० पार…

४१ व्या षटकात सलग दोन धक्के बसल्यानंतर लोकेश राहुलने कर्णधार कोहलीसह भारताचा डाव सांभाळला आणि भारताची धावसंख्या १५० च्या पुढे नेली. द. आफ्रिकेचे गोलंदाज विकेट घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. पण राहुल आणि विराट त्यांच्या दबाव न जुमानता टीच्चून फलंदाजी करत आहेत. दोघांमध्ये तिस-या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली आहे.

केएल राहुलचे अर्धशतक…

भारताला दोन धक्के बसल्यानंतर सलामीवीर केएल राहुल याने कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले आहे. त्याने १२७ चेंडूत ५१ धावांच्या खेळीत नऊ चौकार मारले असून तो क्रीजवर उपस्थित आहे. पुजारा बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली क्रीझवर आला असून तो चांगल्या लयीत दिसत आहे. जॅनसेनच्या चेंडूवर त्याने चौकारही मारला.

भारताला दुसरा झटका…

चेतेश्वर पुजारा पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला लुंगी एनगिडीच्या चेंडूवर टेंबा बावुमाने झेलबाद केले. पुजाराच्या फॉर्मवर आधीच प्रश्न उपस्थित केले जात होते आणि अशा प्रकारे बाद झाल्यानंतर त्याला संघातून वगळले जावे अशी मागणी सोशल मीडियात चाहते करत आहेत.

  • ११ व्या कसोटीत पुजारा शून्यावर बाद झाला.
  • द. आफ्रिकेविरुद्ध शून्यावर बाद होण्याची पुजाराची ही दुसरी वेळ आहे.
  • तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पुजारा ९ व्यांदा शून्यावर बाद झाला.
  • चेतेश्वर पुजाराने गेल्या ४२ डावात एकही शतक झळकावलेले नाही.

भारताला पहिली झटका….

लुगी एनगिडीने भारताला पहिला धक्का दिला आहे. त्याने मयंक अग्रवालला एलबीडब्ल्यू आऊट केले. मयंकने ९ चौकारांच्या मदतीने १२३ चेंडूत ६० धावा केल्या.

टीम इंडियाची शतकी सलामी..

भारताच्या के एल राहुल आणि मयंक अग्रवाने शतकी सलामी दिली आहे. दोघांनी टीच्चून फलंदाजी करत द. आफ्रिकन गोलंदाजांना फेस आणला आहे. आफ्रिकेच्या मैदानावर ११ वर्षानंतर भारताच्या सलामीच्या जोडीने शतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी २०१० मध्ये गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांनी भारतासाठी १३७ धावांची सलामी दिली होती. तर वर्ष २००० नंतर ही तिसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय सलामीवीरांनी द. आफ्रिकेच्या मैदानावर एका डावात ५०+ धावांची भागिदारी केली आहे. मयंक अग्रवालने आपली सहावी कसोटी ८९ चेंडूत आणि द. आफ्रिकेविरुद्ध पहिले अर्धशतक पूर्ण केले. परदेशी भूमीवरील त्याचे हे ५ वे अर्धशतक आहे. भारताच्या सलामीच्या जोडीने आफ्रिकेत शतकी भागीदारी करण्याची ही तिसरी वेळ आहे. दिनेश कार्तिक आणि वसीम जाफर यांनी पहिल्यांदा १५३ धावांची भागिदारी केली होती. यानंतर गंभीर-सेहवाग आणि आता मयंक-राहुल या जोडीने हा पराक्रम केला आहे.

मयंकचे अर्धशतक…

भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी शानदार सुरुवात केली आहे. या दोघांनी चांगल्या स्ट्राईक रेटने तसेच नवीन चेंडू खेळून काढत धावा केल्या. मार्को जॅन्सनच्या २९. १ व्या षटकात मयंक अग्रवालने चौकार लगावून आपले अर्धशतक पूर्ण केले. दोन्ही फलंदाज लयीत असून मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहेत.

पहिले सत्र भारताच्या नावावर…

सामन्याचे पहिले सत्र भारताच्या नावावर राहिले. लंच टाईमसाठी खेळ थांबला तेव्हा भारताच्या सलामीच्या जोडीने २८ षटकांत ८३ धावा केल्या. द. आफ्रिकेच्या गोलंदाजांना नव्या चेंडूचा फायदा उठवता आलेला नाही. राहुल आणि मयंकने नवीन चेंडूवर संयमी खेळी करत झटपट धावा केल्या. मयंक अग्रवाल ४६ आणि राहुल २९ धावांवर खेळत आहेत.

मयंक अग्रवाल-लोकेश राहुलची अर्धशतकी भागिदारी…

मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी शानदार फलंदाजी करताना ५० धावांची भागीदारी केली. २०१० नंतर भारताच्या सलामी जोडीने आफ्रिकेत ५० धावांची भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मयंक अग्रवालला जीवदान…

१८ वे षटक टाकणाऱ्या मार्को जेन्सनच्या तिसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकने मयंक अग्रवालचा सोपा झेल सोडला. अतिरिक्त बाऊन्सनंतर जेन्सेनचा चेंडू मयंकच्या बॅटची कड घेऊन डी कॉकपर्यंत पोहोचला, पण तो चेंडू पकडण्यात अपयशी ठरला. त्यावेळी मयंक ३६ धावांवर फलंदाजी करत होता.

आफ्रिकेचा पहिला रिव्ह्यू वाया…

पाचव्या षटकातील चौथ्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेने राहुल झेलबाद असल्याचे अपिल केले. पण पंचांनी तो बाद नसल्याचा कौलदिला. त्यामुळे द. आफ्रिका संघाने रिव्ह्यू घेतला. त्यानंतर रिप्लेमध्ये चेंडू राहुलच्या बॅटऐवजी त्याच्या खांद्यावर लागल्याचे दिसले. तिस-या पंचांनीही त्याला नाबाद घोषित केले. यासह आफ्रिकेचा पहिला रिव्ह्यू खराब झाला. यानंतर जॅनसेनच्या पहिल्याच षटकात मयंकने तीन चौकार मारले. पहिल्या तासाभराच्या खेळात राहुल आणि मयंक यांनी चांगली फलंदाजी केली. राहुल सावधपणे खेळला आणि बहुतेक चेंडू सोडताना दिसला. त्याचवेळी, अग्रवालने खराब चेंडूंवर आपले शॉट्स खुलेपणाने खेळले. खेळाच्या पहिल्या सत्रात आफ्रिकन गोलंदाजांना नव्या चेंडूचा योग्य वापर करता आल्याचे दिसले.

राहुल आणि अग्रवाल यांनी डावाची सुरुवात केली..

लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी भारताकडून डावाची सलामी दिली. त्याचवेळी कागिसो रबाडाने आफ्रिकेसाठी पहिले षटक टाकले. राहुलने पहिले षटक खेळून काढले. या षटकात एकही धाव मिळाली नाही. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मयंकने दोन धावा घेत आपले आणि भारताचे खाते उघडले. मयंक अग्रवालने एन्गिडीच्या चेंडूवर सामन्यातील पहिला चौकार ठोकला.

ऋषभ पंत धोनीचा मोठा विक्रम मोडू शकतो..

या सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मोठा विक्रम मोडू शकतो. यष्टिरक्षक म्हणून पंतने २५ कसोटी सामन्यात ९७ बळी घेतले आहेत. या कसोटीत त्याने तीन विकेट्स घेतल्यास तो सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा भारतीय यष्टीरक्षक ठरेल. एमएस धोनीने ३६ कसोटी सामन्यांमध्ये १०० विकेट पूर्ण केल्या आहेत. सध्या भारतासाठी सर्वात जलद १०० बळी घेण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र, यावेळी विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इतिहास रचून कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताने १९९२ मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.

टीम इंडियाचे मिशन आफ्रिका सुरू…

टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिका मिशन सुरू झाले आहे. भारत प्रथम फलंदाजी करत असून मयंक अग्रवाल, केएल राहुल सलामीला आले आहेत. दुखापतीमुळे रोहित शर्मा या मालिकेचा भाग होऊ शकला नाही आणि त्याला भारतातच राहावे लागले आहे.

भारताचा संघ असा :

केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

द. आफ्रिका संघ असा :

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रस्सी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), विआन मुल्डर, मार्को जेन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

Back to top button