

मँचेस्टर; वृत्तसंस्था : चॅम्पियन्स लीगच्या शर्यतीत आपला दबदबा कायम राखताना मँचेस्टर युनायटेडने अॅस्टन व्हिलाचा पराभव केला. रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात युनायटेडने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजयावर शिक्कामोर्तब केले. युनायटेडतर्फे कॅसेमिरो, कुन्हा व सेस्को यांनी प्रत्येकी 1, तर अॅस्टॉन व्हिल्लातर्फे आर. बार्कलेने एकमेव गोल केला.
53 व्या मिनिटाला कॅसेमिराने खाते उघडले, तर 71 व्या मिनिटाला रॉस बार्कलेने व्हिल्लाला बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर मॅथ्यूस कुन्हाने युनायटेडला पुन्हा आघाडी मिळवून दिली. ब्रुनो फर्नांडिसने मध्यरेषेवरून दिलेल्या सुरेख पासवर कुन्हाने चपळाईने चेंडूचा ताबा घेतला. एमिलीयानो मार्टिनेझला चकवत कुन्हाने मारलेला किक थेट जाळ्यात विसावला.
या गोलसाठी दिलेला असिस्ट हा ब्रुनो फर्नांडिसचा युनायटेडसाठी 100 वा आणि प्रीमियर लीगमधील 16 वा असिस्ट ठरला. या मोसमातील ही सर्वोच्च कामगिरी असून, ‘प्लेअर ऑफ द सीझन’ पुरस्कारासाठी त्याने आपला दावा आणखी भक्कम केला.
81 व्या मिनिटाला बेंजामिन सेस्कोने गोल करत युनायटेडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कुन्हाने दिलेल्या पासवर सेस्कोने चपळाईने चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. या विजयामुळे मँचेस्टर युनायटेडने गुणतालिकेत दुसर्या स्थानी असलेल्या मँचेस्टर सिटीला आव्हान देण्याच्या द़ृष्टीने पाऊल उचलले आहे. अॅस्टन व्हिलाच्या अनय एमरी यांना या पराभवामुळे धक्का बसला असून, चॅम्पियन्स लीग पात्रतेसाठी त्यांना आणखी झगडावे लागणार आहे.