

IPL 2026 Playoff Prediction: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026च्या हंगामाची सुरुवात 28 मार्चपासून होणार असून पहिला सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात गतविजेता Royal Challengers Bengaluru आणि Sunrisers Hyderabad आमनेसामने येणार आहेत. हंगाम सुरू होण्यापूर्वीच माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार संघांबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
आकाश चोप्राच्या मते, या वर्षीच्या आयपीएलमध्ये Mumbai Indians, Delhi Capitals, Royal Challengers Bengaluru आणि Punjab Kings हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. विशेष म्हणजे या यादीत त्यांनी Chennai Super Kings किंवा Kolkata Knight Riders यांचा समावेश केलेला नाही.
मागील आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि पंजाब किंग्स यांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. त्यांच्यासोबत Gujarat Titans हाही संघ अंतिम चारमध्ये पोहोचला होता. मात्र अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली चांगली सुरुवात करूनही दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते.
यावर्षी आयपीएल ट्रॉफी कोण जिंकू शकतो, या प्रश्नावर बोलताना चोप्रा म्हणाला की, जो संघ चांगली कामगिरी करेल तोच विजेता ठरेल. मात्र त्याच्या मते दिल्ली कॅपिटल्स यंदा विजेता ठरू शकतो.
यासोबतच त्याने ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांचाही अंदाज व्यक्त केला. त्याच्या मते ऑरेंज कॅपसाठी संजू सॅमसन हा मोठा दावेदार असू शकतो. टी-20 विश्वचषक 2026 मध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेला सॅमसन आता आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून ट्रेड करून सीएसकेने त्याला आपल्या संघात घेतले आहे. सीएसकेसाठी तो आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून खेळण्याची शक्यता असून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
तर पर्पल कॅपसाठी चोप्राने जसप्रीत बुमराहचे नाव घेतले. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणारा बुमराह आयपीएलमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 145 सामन्यांत 183 विकेट्स घेतल्या आहेत.
मात्र एवढ्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही बुमराहला अद्याप पर्पल कॅप जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात तो हा मान मिळवू शकतो, असा अंदाज आकाश चोप्राने व्यक्त केला आहे.