T20 World Cup 2024 : न्‍यूझीलंड संघाला मोठा धक्‍का, ‘या’ दिग्‍गज खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत | पुढारी

T20 World Cup 2024 : न्‍यूझीलंड संघाला मोठा धक्‍का, 'या' दिग्‍गज खेळाडूने दिले निवृत्तीचे संकेत

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यंदाची T20 विश्वचषक स्‍पर्धा न्‍यूझीलंड संघासाठी अत्‍यंत निराशाजनक राहिली आहे. या स्‍पर्धेतील पहिल्‍याच सामन्‍यात संघाला अफगाणिस्‍तानकडून पराभव स्‍वीकारावा लागला. आतापर्यंत खेळलेल्‍या तीनपैकी दोन सामन्‍यात पराभव झाल्‍याने साखळी सामन्‍यातूनच स्‍पर्धेतून बाहेर पडण्‍याची नामुष्‍की न्‍यूझीलंड क्रिकेट संघावर ओढावली आहे.

 माझा शेवटचा टी-२० विश्वचषक

न्यूझीलंडच्या निराशाजनक कामगिरीनंतर ट्रेंट बोल्टने मोठे पाऊल उचलले आहे. त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. युगांडाविरुद्धच्या विजयानंतर ट्रेंट बोल्ट म्हणाला की, हा माझा शेवटचा टी-२० विश्वचषक आहे.

आज ( दि. १५ जून) न्यूझीलंड क्रिकेट संघाने युगांडा संघाचा ९ गडी राखून पराभव केला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना न्‍यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट म्‍हणाला की, माझ्या कारकिर्दीतील हा शेवटचा टी-२० विश्वचषक आहे. अशा परिस्थितीत बोल्ट 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदाच्‍या T20 विश्वचषक स्‍पर्धेतील तीन सामन्‍यात बोल्‍टने घेतले सात बळी

यंदाच्‍या T20 विश्वचषक स्‍पर्धेत बोल्‍टने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत खेळलेल्या 3 सामन्यात ६.४२ सरासरीने त्‍याने ७ बळी घेतले आहेत. १६ धावांमध्‍ये ३ बळी ही त्‍याच्‍या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आता ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना पापुआ न्यू गिनीशी होणार आहे. हा सामना सोमवारी होणार आहे.

T20 विश्वचषकातील बोल्‍टची कामगिरी

बोल्टने आतापर्यंत T20 विश्वचषकातील १७ सामने खेळला आहे. त्याने १७ डावात 12.84 च्या सरासरीने आणि 6.07 च्या इकॉनॉमीने 32 विकेट्स घेतल्या आहेत. 2014 मध्ये त्‍याने पहिला T20 विश्‍वचषक स्‍पर्धेत सहभागी झाला. बोल्टच्या नावावर 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८१ बळी आहेत.

Back to top button