CSK vs KKR : होमग्राऊंडवर चेन्नई ‘एक्स्प्रेस’ | पुढारी

CSK vs KKR : होमग्राऊंडवर चेन्नई ‘एक्स्प्रेस’

चेन्नई, वृत्तसंस्था : आधी गोलंदाजांचा धुमाकूळ आणि नंतर फलंदाजांचा तडाखा, त्यांना मिळालेली उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची जोड याच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर (CSK vs KKR) 7 विकेटस्नी विजय मिळवला. रवींद्र जडेजा, तुषार देशपाडे यांनी प्रत्येकी 3 विकेट घेत, तर कर्णधार ऋतुराज गायकवाड (नाबाद 67) याने अर्धशतक झळकावत विजयात सिंहाचा वाटा उचलला. चेन्नईने केकेआरला 9 बाद 137 धावांवर रोखले आणि हे लक्ष्य 17.4 षटकांत गाठले. चेन्नईचे पाच सामने झाले असून, त्यापैकी त्यांनी 3 जिंकले आहेत, हे तिन्ही विजय त्यांनी होमग्राऊंडवर मिळवले आहेत.

चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर सीएसकेच्या गोलंदाजांनी आपले काम चोख बजावल्यानंतर रचिन रवींद्र आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी केकेआरच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यास सुरुवात केली; पण वैभव अरोराने रचिनला (15) बाद करून केकेआरला पहिले यश मिळवून दिले; पण यानंतर ऋतुराज आणि डॅरिल मिशेल यांनी कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी घेत धावफलक हालता ठेवला. संघाची धावसंख्या शतकाजवळ पोहोचली असताना सुनील नारायणने मिशेलचा त्रिफळा उडवला. त्याने 25 धावा केल्या.

दरम्यान, कर्णधाराने 45 चेंडूंत अर्धशतकी टप्पा ओलांडला. त्याच्या जोडीला शिवम दुबे आला होता. दुबेने अरोराला षटकार ठोकून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले; पण पुढच्या चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. शेवटी धोनीने बरोबरीची धाव घेतली, तर ऋतुराजने विजयी चौकार ठोकला. (CSK vs KKR)

तत्पूर्वी, सीएसकेने टॉस जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. फिल सॉल्टला पहिल्याच चेंडूवर तुषार देशपांडेने माघारी पाठवले. अंगकृष रघुवंशी व सुनील नारायण यांच्या अर्धशतकी भागीदारीने केकेआरला सावरले होते; पण गोलंदाजीतील बदल सीएसकेच्या फायद्याचा ठरला. सातव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाने रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करणार्‍या रघुवंशीला (24) पायचीत केले आणि पाचव्या चेंडूवर नारायणची (27) विकेट मिळवून दिली. लाँग ऑफवर तिक्षणाने झेल घेतला. जडेजाने त्याच्या पुढच्या षटकात वेंकटेश अय्यरला (3) माघारी पाठवून केकेआरला चौथा धक्का दिला. सीएसकेने फिरकीचा मारा सुरू केला आणि महिश तिक्षणाने पाचवा धक्का देताना रमणदीप सिंगचा (13) त्रिफळा उडवला.

रवींद्र जडेजाने 4-0-18-3 असा स्पेल टाकला. चेन्नईने त्यांच्या फिरकी मार्‍याचा सुरेख वापर करून घेताना कोलकाताच्या धावगतीवर वेसण घातले होते. यानंतर श्रेयस अय्यर व रिंकू सिंग यांच्यावर मोठी जबाबदारी होती. तुषार देशपांडेने डावातील दुसरी विकेट घेताना रिंकू सिंगला (9) माघारी पाठवले. तुषारने स्फोटक आंद्रे रसेलला (10) स्वस्तात बाद करून डावातील तिसरी विकेट घेतली. तुषारने 4-0-33-3 अशी गोलंदाजी केली. 19 व्या षटकात श्रेयस अय्यर (34) याला मुस्तफिजूर रहमानने बाद केले. कोलकाताला 20 षटकांत 9 बाद 137 धावा करता आल्या.

कोलकाता नाईट रायडर्स : 20 षटकांत 9 बाद 137. (श्रेयस अय्यर 34, सुनील नारायण 27. रवींद्र जडेजा 3/18.)
चेन्नई सुपर किंग्ज : 17.4 षटकांत 3 बाद 141. (ऋतुराज गायकवाड नाबाद 67, शिवम दुबे 28. वैभव अरोरा 2/28.)

हेही वाचा…

Back to top button