Khelo India Youth Games : मल्लखांबमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व, पदकांचा तिहेरी धमाका | पुढारी

Khelo India Youth Games : मल्लखांबमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व, पदकांचा तिहेरी धमाका

चेन्नई, वृत्तसंस्था : मल्लखांबमध्येही (Khelo India Youth Games) महाराष्ट्राने वर्चस्व गाजवताना आज तिहेरी धमाका केला. महाराष्ट्राने मुलांच्या गटात 125.45 गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकले. या संघामध्ये वेदांत शिंदे, रणवीर मोहिते, शार्दूल ऋषीकेश, निशांत लोखंडे, मृगांक पाथरे, आयुष कलंगे यांचा समावेश होता. मुलींच्या गटात महाराष्ट्रालाच सांघिक सुवर्णपदक मिळाले. आर्या साळुंखे, भक्ती मोरे, प्रणाली मोरे, सई शिंदे, पलक चुरी व वैष्णवी पवार यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने 83.80 गुणांची नोंद केली. मुलांच्या विभागात महाराष्ट्राच्या शार्दूल ऋषीकेश याने वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. त्याने टांगता, पुरलेला व दोरीचा मल्लखांब या तिन्ही प्रकारांत अप्रतिम कौशल्य दाखवत हे यश संपादन केले. त्याला 25.45 गुण मिळाले. तो चेंबूर येथील जवाहर विद्या भवन केंद्रात सुनील गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

योगासनांच्या आर्टिस्टिक पेअर या प्रकारातील मुलांच्या गटात संगमनेर, अहमदनगरच्या यश लगड आणि प्रणव साहू या दोघांनी सुवर्ण, तर आर्यन खरात व तन्मय म्हाळसकर यांनी रौप्य पदक मिळविले. संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी असणारे चौघेही विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील व किरण वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 ते 8 तास सराव करतात.

स्क्वॉशमध्ये रौप्य पदक (Khelo India Youth Games)

महाराष्ट्राच्या निरुपमा दुबेने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक मिळविले. निरुपमाला तामिळनाडूच्या पूजा आरतीकडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.

सायकलिंगमध्ये महाराष्ट्राच्या वेदांत जाधवला सुवर्ण

महाराष्ट्राच्या वेदांत जाधवने चेन्नईतील तामिळनाडू क्रीडा विद्यापीठच्या सायकल ट्रॅकवर वैयक्तिक 200 मीटर स्प्रींट प्रकारात सुवर्णपदकाची शर्यत जिंकली. पुण्याच्या वेदांत जाधवने केरळचा अनुभवी खेळाडू जोहानला मागे टाकून महाराष्ट्रासाठी सायकलिंगमधील पहिले सोनेरी यश संपादन केले. अंतिम फेरीत केरळकडून खेळणार्‍या अर्थव पाटीलला कडवी झुंज देत वेदांतने सुवर्ण पदकाचा करिष्मा घडविला. त्याने उपांत्य फेरीत अंदमान निकोबारच्या जोहनला सलग 2 शर्यती पराभूत करून महाराष्ट्राचे पदक निश्चित केले होते. पुण्यात प्रशिक्षक दर्शन बारगुजे व दीपाली पाटील यांचे मार्गदर्शनावाखाली तो सराव करतो.

Back to top button