Virat Kohli Records : विराट कोहलीच्या निशाण्यावर ‘हे’ 5 मोठे विक्रम! टी-20 त रचणार इतिहास | पुढारी

Virat Kohli Records : विराट कोहलीच्या निशाण्यावर ‘हे’ 5 मोठे विक्रम! टी-20 त रचणार इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Records : विराट कोहलीची गणना भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. जेव्हा तो लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाला उद्ध्वस्त करू शकतो. एकदा तो क्रीजवर स्थिरावला की त्याला रोखणे कठीण होऊन बसते. टीम इंडियासाठी परिस्थिती कितीही कठीण असली तरी कोहली क्रीजवर असेल तर विजय शक्य असल्याचा विश्वास सर्वांनाच असतो. कोहलीने 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली. सन 2023 मध्ये, त्याने सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांचा विक्रम मोडला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतके करणारा तो जगातील एकमेव फलंदाज बनला. आता 2024 मध्येही तो अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

1. इंग्लंडविरुद्ध करिष्मा करू शकतो

भारतीय संघाला 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका भारतीय भूमीवर खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत 30 धावा करताच विराट चार हजार धावा पूर्ण करेल. याचबरोबर तो इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल. (Virat Kohli Records)

2. टी-20 मध्ये 12000 हजार धावा (Virat Kohli Records)

विराट कोहलीने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत 374 सामन्यांमध्ये 11965 धावा केल्या आहेत, ज्यात 8 शतकांचा समावेश आहे. जर त्याने या वर्षी टी20 सामन्यांमध्ये आणखी 35 धावा केल्या तर तो टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या 12000 धावा पूर्ण करेल आणि टी20 क्रिकेटमध्ये 12000 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनेल. त्याच्या आधी ख्रिस गेल, शोएब मलिक आणि किरॉन पोलार्ड यांनी टी-20 क्रिकेटमध्ये हा चमत्कार केला आहे.

3. ‘या’ खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो

कोहलीने आतापर्यंत 292 वनडे सामन्यांमध्ये 13848 धावा केल्या आहेत. जर त्याने या वर्षी आणखी 152 धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या 14000 धावा पूर्ण करेल आणि असे करणारा तो फक्त तिसरा खेळाडू बनेल. त्याच्या आधी कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर यांनी ही कामगिरी केली होती. अशातच कोहली सर्वात जलद चौदा हजार धावा करण्याचा पराक्रमही आपल्या नावावर करू शकतो.

4. घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके

घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनण्यासाठी कोहलीला 5 शतकांची गरज आहे. हा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या खात्यात आहे. त्याने 24 वर्षांच्या कारकिर्दीत घरच्या मैदानावर 42 शतके झळकावली आहेत.

5. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके

कोहली न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा भारतीय खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे. ही कामगिरी करण्यासाठी त्याला एका शतकाची गरज आहे. कोहली आणि सचिन यांच्या नावे प्रत्येकी 9 शतके आहेत.

Back to top button