IND vs SA : दुसर्‍या कसोटीत भारतीय संघात होणार दोन बदल? | पुढारी

IND vs SA : दुसर्‍या कसोटीत भारतीय संघात होणार दोन बदल?

केपटाऊन, वृत्तसंस्था : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि 32 धावांनी गमावल्यानंतर भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. रोहित शर्मा आणि कंपनीचे लक्ष केपटाऊन कसोटीत विजयाकडे असेल आणि मालिका 1-1 अशी संपुष्टात येईल. दुसर्‍या कसोटीत भारताच्या प्लेईंग 11 मध्ये किमान 2 बदल होण्याची शक्यता आहे.

सेंच्युरियन कसोटीत भारताची कामगिरी अत्यंत खराब होती. रवींद्र जडेजा तंदुरुस्त नसल्यामुळे सेंच्युरियन कसोटीत खेळू शकला नाही, पण दुसर्‍या कसोटीपूर्वी तो तयार दिसत आहे. नेटमध्ये घाम गाळत आहे. जडेजाच्या जागी संघात कोणाची वर्णी लागते हे पाहणे बाकी आहे, तर मुकेश कुमारलाही केपटाऊन कसोटीत संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रवींद्र जडेजा संघात आल्यामुळे भारताच्या फलंदाजीत आणखीन भर पडेल आहे आणि त्याची तगडी लाईन आणि लेन्थ बॉलिंग आफ्रिकन फलंदाजांना अडचणीत आणू शकते. अश्विनच्या जागी जडेजाचा संघात समावेश करू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. पण रोहित शर्मा ही चूक करणार नाही. केपटाऊनची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल आहे, त्यामुळे रोहित अश्विन आणि जडेजा या दोघांचाही प्लेईंग 11 मध्ये समावेश करू शकतो. अशा स्थितीत अश्विन बाहेर जाणार नसेल तर संघाबाहेर कोण? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. गेल्या सामन्यात पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा या सामन्यात बाहेर जाऊ शकतो. कृष्णाने पहिल्या कसोटीत 20 षटकांत 93 धावांत एक बळी घेतला होता. (IND vs SA)

प्लेईंग इलेव्हनमधील दुसरा बदल म्हणजे शार्दूल ठाकूर बाहेर जाऊ शकतो. शनिवारी असे वृत्त आले होते की नेट सत्रादरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती, तर सेंच्युरियन कसोटीतही त्याची कामगिरी विशेष नव्हती. अशा परिस्थितीत भारत तिसरा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज मुकेश कुमारसोबत केपटाऊनला खेळू शकतो. आता 3 जानेवारीला शार्दूल ठाकूरचा फिटनेस कसा आहे आणि रोहित शर्मा यावर काय निर्णय घेतो हे पाहावे लागेल.

Back to top button