India vs South Africa 1st Test : रबाडाने चकवले, राहुलने सावरले | पुढारी

India vs South Africa 1st Test : रबाडाने चकवले, राहुलने सावरले

सेंच्युरियन, वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. मात्र, सत्राच्या शेवटी भारतीय फलंदाजांनी डाव सावरत संघाला दिलासा दिला. विराट कोहली (38) आणि के. एल. राहुलचे (70) नाबाद अर्धशतक यांच्यामुळे भारताला दोनशेच्या पुढे जाता आले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा 59 षटकांनंतर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यातच नंतर जोरदार पाऊस सुरू झाला. हा पाऊस लवकर थांबण्याची चिन्हे नसल्याने पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली. यावेळी भारताच्या 59 षटकांत 8 बाद 208 धावा झाल्या होत्या. के. एल. राहुल 70 धावांवर नाबाद होता.

ढगाळ वातावरणात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी घेतली. हिरव्या खेळपट्टीवर गोलंदाजी करणार्‍या दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार रोहितला 5 धावांवर बाद केले. त्यानंतर डावखुर्‍या बर्गरने यशस्वी जयस्वालला (17) आणि शुभमन गिलला (2) धावांवर बाद करत भारताची अवस्था 3 बाद 24 धावा अशी केली.

यानंतर आलेल्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत उपाहारापर्यंत भारताला 91 धावा करून दिल्या. खेळ थांबला त्यावेळी विराट 33 आणि अय्यर 31 धावा करून नाबाद होते.
दुसर्‍या सत्रात कगिसो रबाडा भारताची डोकेदुखी ठरला. उपाहारानंतर संघाच्या धावसंख्येत विराटने केवळ एका धावेची भर घातली; तर रबाडाने श्रेयस अय्यरचा त्रिफळा उडवला. अय्यर 31 धावांवर बाद झाला. यानंतर रबाडानेच विराट कोहलीची 38 धावांवर शिकार करत भारताला पाचवा आणि मोठा धक्का दिला. 107 धावांत भारताचा निम्मा संघ तंबूत परतला.

संबंधित बातम्या

यानंतर लोकेश राहुलने भारताचा डाव सावरला. त्याने आधी रविचंद्रन अश्विन (8) आणि शार्दूल ठाकूर (24) यांना साथीला घेत धावसंख्येत भर घातली. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या 7 बाद 176 धावा झाल्या होत्या. चहापानानंतर के. एल. राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले.

रोहित शर्माला बाद करून रबाडाचा विक्रम

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, टी-20 आणि वन-डे) सर्वाधिक वेळा न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने बाद केले आहे; पण आता द. आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने किवी गोलंदाजाला मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे. साऊदीने 12 वेळा रोहित शर्माला बाद केले आहे, तर रबाडाने हिटमॅनची विकेट 13 व्यांदा घेतली आहे. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने रोहितला 10 वेळा, तर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने 9 वेळा बाद केले आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने रोहितची आठवेळा विकेट घेतली आहे. या सामन्यात आऊट होण्यापूर्वी रोहित शर्माने 14 चेंडूंत 5 धावा केल्या आणि यात फक्त एका चौकाराचा समावेश आहे.

जडेजाला पाठदुखी

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या संघात दोन बदल केले. दुखापतीमुळे कसोटी मालिका मुकलेल्या मोहम्मद शमीऐवजी प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली आहे; तर फिरकीपटू रवींद्र जडेजाऐवजी रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली आहे. संघ निवडीवेळी डावखुर्‍या रवींद्र जडेजाची दावेदारी प्रबळ होती. मात्र, त्याच्या पाठीला दुखापत झाल्याने रोहित शर्माने त्याच्याऐवजी अश्विनला संधी दिली आहे.

Back to top button