IPL Auction 2024 : 77 जागांसाठी 333 खेळाडूंवर बोली | पुढारी

IPL Auction 2024 : 77 जागांसाठी 333 खेळाडूंवर बोली

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंडियन प्रीमिअर लीग 2024 चा लिलाव (IPL Auction 2024) 19 डिसेंबरला दुबईत होणार आहे. यासाठी लिलावात सहभागी होणार्‍या खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यात केवळ 333 खेळाडूंवर आयपीएल लिलावात बोली लावली जाणार आहे. यंदाचा लिलाव हा इतिहासातील पहिला विदेशात होणारा लिलाव ठरणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता हा लिलाव सुरू होईल.

2024 साठी तब्बल 1,166 खेळाडूंनी नाव नोंदवले होते आणि त्यात 830 भारतीय, तर 336 विदेशी खेळाडूंचा समावेश होता; पण सर्व फ्रँचाईझींकडून आलेल्या शिफारशींवरून यापैकी केवळ 333 खेळाडूंवर आयपीएल लिलावात बोली लावली जाणार आहे. यात 214 भारतीय, तर 119 विदेशी खेळाडू आहेत. सर्व संघांचे मिळून फक्त 77 स्लॉट शिल्लक आहेत. यातील 30 स्लॉट हे विदेशी खेळाडूंसाठी आहेत. मुंबई इंडियन्सने रीलिज केलेल्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने लिलाव प्रक्रियेसाठी नाव नोंदवलेले नाही.

यंदाच्या लिलावात गुजरात टायटन्सच्या ‘पर्स’मध्ये सर्वाधिक पैसे असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या 38.15 कोटी रुपये शिल्लक आहेत, तर सर्वाधिक स्लॉट हे कोलकाता नाईट रायडर्सला भरायचे आहेत. (IPL Auction 2024)

यंदाच्या आयपीएल लिलावात नुकत्याच झालेल्या वन-डे वर्ल्डकपचा प्रभाव नक्की असणार आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यामुळे यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंची चलती असण्याची शक्यता आहे. यात मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड यासारख्या खेळाडूंवर किती बोली लागते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

यंदाच्या लिलावात एकूण 23 खेळाडूंनी आपली बेस प्राईस ही 2 कोटी इतकी ठेवली आहे. इंग्लंडचा हॅरी ब्रूक, ख्रिस वोक्स, बेन डकेट यांनी सुमार कामगिरीनंतरही आपली बेस प्राईस 2 कोटी रुपये ठेवली आहे.

दुसरीकडे, वन-डे वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणार्‍या न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र आणि अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला उमरजाई यांनी आपली बेस प्राईस 50 लाख ठेवली; मात्र या दोघांवर अनेक फ्रँचाईजी बोली लावतील, अशी आशा आहे.

Back to top button