IND Vs NZ Semi-Final : संघ तेच आणि सामनाही सेमीफायनलचाच, चार वर्षांत भारत-न्‍यूझीलंड संघ किती बदलले? | पुढारी

IND Vs NZ Semi-Final : संघ तेच आणि सामनाही सेमीफायनलचाच, चार वर्षांत भारत-न्‍यूझीलंड संघ किती बदलले?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेटप्रेमींसाठी सामन्‍यातील विजय जेवढा स्‍मरणीय असतो तेवढीच महत्त्‍वाच्‍या सामन्‍यातील पराभवाची आठवण कायम मनात कायमस्‍वरुपी घर करुन राहते. या खेळातील थरारा जेवढा आनंद देतो तेवढाच जय-पराजयही कायमस्‍वरुपी लक्षात राहतो. त्‍यामुळेच १० जुलै २०१९ हा दिवस भारतीय क्रिकेटप्रेमींच्‍या मनाला एक सल देवून गेला होता. कारण या दिवशी विश्‍वचषकापासून केवळ दोन पावले दूर असणार्‍या टीम इंडियाचा न्‍यूझीलंडच्‍या संघाने पराभव केला होता. गेली चार वर्ष भारतीय क्रिकेटप्रेमींच्‍या मनात पराभवाची ही सल आजही कायम आहे. गत विश्‍वचषक स्‍पर्धेतील भारताची कामगिरी ही विश्‍वविजेत्‍यासारखीच होती. मात्र १० जुलै हा दिवशी दिवस टीम इंडियाचा नव्‍हता. सारे फासे उलटे पडले. पावसानेही न्‍यूझीलंड संघाला साथ दिली आणि तिसर्‍यांदा जगज्‍जेता होण्‍यापासून न्‍यूझीलंडने भारताला रोखले होते. आज १५ नोव्‍हेंबर २०२३. चार वर्ष, चार महिने आणि पाच दिवसांनंतर पुन्‍हा एकदा असाच दिवस उजाडला आहे. (IND Vs NZ Semi-Final )  मुंबईतील वानखेडे मैदानावर एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेतील उपांत्‍य फेरीत भारत आणि न्‍यूझीलंड पुन्‍हा एकदा आमने-सामने असणार आहेत. गेल्‍या चार वर्षांमध्‍ये दोन्‍ही संघांमध्‍ये बरेच बदल झालेले आहेत. जाणून घेवूया दोन्‍ही संघात झालेल्‍या बदलाविषयी…

IND Vs NZ Semi-Final : टीम इंडियात झालेले बदल

गतविश्‍वचषक स्‍पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्‍व विराट कोहलीकडे होते. आता संघाचे नेतृत्त्‍व रोहित शर्माकडे आहे. गत उपात्‍यं फेरीत सामन्‍यात भारतीय संघात महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल यांचा समावेश होता. यंदाही हे चार खेळाडू संघात नाहीत. महेंद्रसिंह धोनीने २०२० मध्‍ये निवृत्ती जाहीर केली. हार्दिक पांड्या 2019 मध्ये खेळला होता आणि यावेळीही तो संघात होता,पण त्‍याहीवेळी तो दुखापतीमुळे तो बाहेर होता.

IND Vs NZ Semi-Final : न्यूझीलंडच्‍या संघात झालेले बदल

न्‍यूझीलंड संघाचा कर्णधार यंदाही केन विल्‍यमसन हाच आहे. मात्र यावेळी संघातील सहा खेळाडू नवीन आहेत. मार्टिन गुप्टिल, हेन्री निकोल्स, रॉस टेलर आणि 2019 सेमीफायनल खेळलेले कॉलिन डी ग्रँडहोम यावेळी संघात नाहीत. टेलर आणि ग्रँडहोम निवृत्त झाले आहेत. 2019 मध्ये खेळलेला जिमी नीशम संघात आहे; पण दुखापतीमुळे तो संघाबाहेर राहिल. मॅट हेन्रीलाही दुखापत झाली असून तो स्पर्धेबाहेर आहे.

गतविश्‍वचषकाप्रमाणेच यंदाही दोन्‍ही संघाची स्‍थिती

यंदाच्‍या विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत नंबर एकवर तर न्यूझीलंड चौथ्‍या क्रमाकांवर आहे. २०१९मध्‍येही टीम इंडियाने बहारदार कामगिरी करत अग्रस्‍थानी राहिले होते. तर न्‍यूझीलंड चौथ्‍याच क्रमांकावर होते. मात्र, 2019 च्या तुलनेत यावेळी दोन्ही संघांच्या साखळी सामन्यांच्या कामगिरीत निश्चितच फरक आहे. कारण २०१९ च्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताने उपांत्य फेरीपूर्वी सात सामने जिंकले होते. संघ 1 सामन्यात पराभूत झाला होता आणि 1 सामना (वि न्यूझीलंड) पावसामुळे रद्‍द झाला होता. यंदा भारतीय संघ सर्व 9 सामने जिंकत स्‍पर्धेत अजिंक्‍य राहिला आहे.

2019 मध्ये उपांत्य फेरीपूर्वी न्यूझीलंडने ९ पैकी केवळ पाच सामने जिंकले होते आणि तीन सामन्‍यात पराभवाचा सामना केला होता. यावेळीही न्यूझीलंडने केवळ 5 सामने जिंकले असले तरी संघाच्या पराभवाची संख्या 4 झाली आहे. यंदा न्‍यूझीलंडची विजयाची टक्‍केवारी ही ५६ असून ४४ टक्‍के सामने पराभूत झाले आहेत.

मुंबईतील वानखेडे मैदानावर वेगवान गोलंदाजांना फायदा होणार ?

2019 विश्वचषकाचा उपांत्य सामना इंग्लंडमधील मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला गेला. तर यंदा उपांत्य सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मँचेस्टर हे सामान्य इंग्रजी परिस्थिती असलेले मैदान आहे. येथे शिवण आणि स्विंग हालचाली वेगवान गोलंदाजांना फायदा देतात. मुंबईत दिवसभरात फारशी हालचाल नसली तरी दुसऱ्या डावात लाइट्सखाली नवीन चेंडूचा सामना करणे कठीण आहे.

मागील उपांत्‍य फेरीच्या सामन्यात पाऊस न्‍यूझीलंडच्‍या मदतीला धावला

१० जुलै २०१९ रोजी गतविश्‍वचषक स्‍पर्धेतील उपांत्‍य फेरीचा सामना सामना इंग्लंडमधील मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झाला होता. भारताने प्रथम गोलंदाजी करत न्यूझीलंडला २३९ धावांवर रोखले होते;पण पावसामुळे त्या दिवशी सामना पूर्ण झाला नाही. मग राखीव दिवशी खेळ झाला. टीम इंडियाने 92 धावांवर 6 विकेट गमावल्या. नंतर धोनी आणि जडेजाने चांगली भागीदारी केली. या सामन्‍यात धोनीने ७२ चेंडूत ५० धावा केल्या. मात्र धोनी रनआऊट झाला आणि कोट्यवधी भारतीयांची निराशा झाली. यानंतर फर्ग्युसनने भुवनेश्वरला बोल्ड केले आणि चहलला निशमने बाद केले. अखेरीस, भारतीय संघ 49.3 षटकात 221 धावांवर आटोपला आणि तीन चेंडू शिल्लक असताना 18 धावांनी सामना गमावला. धोनी रनआऊट झाला नसता तर भारताने सामना जिंकत अंतिम सामन्‍यात धडक मारली असती, असे आजही भारतीय क्रिकेटप्रेमींना वाटते. आजही या पराभवची सल त्‍यांच्‍या मनात आहे.

वानखेडेवर प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाला फायदा

यंदाच्‍या विश्‍वचषक स्‍पर्धेत वानखेडे मैदानावर आतापर्यंत ४ सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी ३ वेळा विजय मिळवला आहे. तिन्ही वेळा संघांनी ३५० पेक्षा अधिक धावा केल्‍या आहेत. दुसऱ्या डावात पहिल्या 15 षटकांसाठी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते असल्‍याचे चित्र आहे. यानंतर खेळपट्टी पुन्हा फलंदाजीसाठी योग्य होते. विजयाच्‍या टक्‍केवारीचा विचार वानखेडे स्‍टेडियमवर भारताने आतापर्यंत २१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. संघाने १२ जिंकले आणि ९ गमावले. म्हणजे येथील संघाचा यशाचा दर ५७ टक्‍के आहे. याच मैदानावर टीम इंडियाने २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरीही जिंकली होती. न्यूझीलंडने मुंबईत 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत, संघाने 2 जिंकले आणि एक पराभव झाला. येथील किवी संघाचा यशाचा दर ६७ टक्‍के इतका आहे. 2017 मध्ये याच मैदानावर न्‍यूझीलंड संघाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला होता.

आज उपांत्‍य फेरीच्‍या सामन्‍यात भारत २०१९चा वचपा काढणार की न्‍यूझीलंड इतिहासाची पुनरावृत्ती करणार याकडे काेट्यवधी क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button