NZ vs AFG : न्यूझीलंडचे अफगाणिस्तानला २८९ धावांचे लक्ष्य | पुढारी

NZ vs AFG : न्यूझीलंडचे अफगाणिस्तानला २८९ धावांचे लक्ष्य

चेन्नई; वृत्तसंस्था : आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील 16 व्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानविरुद्ध निर्धारित 50 षटकांत 6 बाद 288 धावांपर्यंत मजल मारली. ग्लेन फिलीप्स, टॉम लॅथम व विल यंग यांची शानदार अर्धशतके किवीज डावाचे ठळक वैशिष्ट्य ठरले. फिलिप्सने 80 चेंडूंत 71, लॅथमने 74 चेंडूंत 68 तर विल यंगने 64 चेंडूंत 54 धावांचे योगदान दिले.

या लढतीत अफगाणचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने 50 षटकांत 288 धावा नोंदवल्या. यातील शेवटच्या 5 षटकांत तर त्यांनी 62 धावा वसूल केल्या. डेव्हॉन कॉनवे 20 धावांवर बाद झाला, त्यावेळी न्यूझीलंडच्या खात्यावर केवळ 30 धावांची नोंद होती. त्यानंतर विल यंग व रचिन रवींद्र यांनी 79 धावांची भागीदारी साकारली. विल यंगने 54 तर रचिनने 32 धावांचे योगदान दिले. अफगाणने 3 फलंदाजांना अवघ्या एका धावेत तंबूत धाडत किवीज संघाला चांगलाच धक्का दिला. मात्र, तीन अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडला 290 धावांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचता आले.

कर्णधार टॉम लॅथम व ग्लेन फिलिप्स यांनी 144 धावांची शतकी भागीदारी साकारली, ते किवीजसाठी विशेष महत्त्वाचे ठरले. डावाच्या उत्तरार्धात मार्क चॅपमनने जलद 25 धावा फटकावत धावसंख्येला आणखी आकार दिला. ग्लेन फिलिप्सने चौफेर फटकेबाजी करत 80 चेंडूंत 71 धावा करताना 4 चौकार व 4 षटकार फटकावले. कर्णधार टॉम लॅथमनेही 3 चौकार व 2 षटकार वसूल केले. याशिवाय, तिसरा अर्धशतकवीर विल यंगच्या खेळीत 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. मार्क चॅपमनने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी साकारली आणि यामुळे किवीज संघाला 6 गड्यांच्या बदल्यात 288 धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाण संघातर्फे राशीद खानने सर्वात किफायतशीर मारा करताना 10 षटकांत केवळ 43 धावा दिल्या. नवीन हक व अझमतुल्लाह यांनी प्रत्येकी 2 तर मुजीब रहमानने 1 बळी घेतला.

(NZ vs AFG)

हेही वाचा :

Back to top button