ICC ODI World Cup : कांगारूंवरील विजयानंतर टीम इंडियाला धक्का, गिल दुस-या सामन्यालाही मुकणार | पुढारी

ICC ODI World Cup : कांगारूंवरील विजयानंतर टीम इंडियाला धक्का, गिल दुस-या सामन्यालाही मुकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI World Cup : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा धुमधडाक्यात सुरू झाली आहे. सर्व संघांनी प्रत्येक सामना खेळला आहे, परंतु संघांचे टेन्शन अद्याप दूर झालेले नाही. संघ त्यांच्या खेळाडूंच्या दुखापती आणि आजारांशी झगडत आहेत. आता दुसरी फेरी सुरू होत आहे. एकीकडे टीम इंडियाचा सलामीवीर शुबभन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरू शकला नाही, तर दुसरीकडे इंग्लंडचा बेन स्टोक्सही पहिला सामना खेळू शकला नाही. आता बातमी अशी आहे की हे दोन्ही खेळाडू त्यांच्या दुस-या सामन्यालाही मुकणार आहेत.

गिल अफगाणिस्तान विरुद्ध खेळू शकणार नाही

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या काही दिवस आधी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल अचानक आजारी पडला. त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. तथापि, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुबमनचे खेळणे किंवा न खेळणे हे सामन्याच्या सकाळीच विचारात घेतले जाईल, असा खुलासा केला होता. पण रविवारी जेव्हा टीम इंडिया हॉटेलमधून स्टेडियमकडे जाण्यासाठी बाहेर पडली तेव्हा गिल हा पूर्णपणे बरा नसल्याचे समोर आले. अशा स्थितीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. त्याच्या जागी इशान किशन रोहितसोबत सलामीला आला, पण तोही आपली भूमिका योग्यरित्या पार पाडू शकला नाही. इशान पहिल्याच चेंडूवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना भारताने जरी जिंकला असला तरी पुढच्या सामन्यात गिल खेळू शकेल का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. टीम इंडियाचा पुढील सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. पण गिल अद्याप तंदुरुस्त नसल्याचे समजते आहे. त्यामुळे तो पुढील सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इशान किशनला आणखी एक संधी मिळू शकते. (ICC ODI World Cup)

2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

शुबमन गिल यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. भारतीय सलामीवीराने 2023 मध्ये 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 72.35 च्या सरासरीने आणि 105.03 च्या स्ट्राइक रेटने 1,230 धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात एकूण 6 वनडे शतके जमा आहेत, त्यातील 5 शतके 2023 मध्ये ठोकली आहेत.

स्टोक्सही पुढचा सामना खेळू शकणार नाही

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सही न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता, त्या सामन्यात इंग्लंडला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता स्टोक्स पुढचा सामना खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे. स्टोक्सच्या कंबरेत वेदना होत असल्याने मंगळवारी धरमशाला येथे होणार्‍या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता फारच कमी आहे, असे ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तात म्हटले आहे.

खरेतर डाव्या गुडघ्याची जुनी दुखापत असूनही, स्टोक्सने विश्वचषकात खेळण्यासाठी एकदिवसीय निवृत्ती मागे घेतली होती. त्याने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला, ज्यामध्ये त्याने विक्रमी 182 धावा तडकावल्या होत्या. दरम्यान, रविवारी आणि सोमवारी स्टोक्स इंग्लिश संघासोबत नेटसेशनमध्ये सहभागी झाला होता. त्याने फलंदाजीचा सराव देखील केला. पण मंगळवारच्या सामन्यात स्टोक्स खेळताना दिसणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. (ICC ODI World Cup)

Back to top button