भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा वन डे सामना | पुढारी

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा वन डे सामना

इंदूर : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज (रविवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करील. मोहालीतील पाटा विकेटवर संधी गमावल्यानंतर श्रेयससाठी इंदूरमध्ये दुसरी संधी असेल. याशिवाय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन 15 ते 40 या षटकांत विकेट घेऊन वर्ल्डकप संघात आपली गरज आहे हे पटवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल. या मालिकेतील पहिला सामना भारताने 5 विकेटस्ने जिंकला होता. अशा स्थितीत भारतीय संघ दुसरी वन डे जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, पण त्याला केवळ 3 धावा करता आल्या. दुर्दैवाने तो धावचित झाला. त्यामुळे फलंदाजीला पोषक असलेल्या पाटा खेळपट्टीवर तो धावांचा वर्षाव करण्याची संधी त्याने गमावली. पाचव्या क्रमांकावर असलेला इशान किशनही 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या दोघांवर दुसर्‍या वन डेत चांगली कामगिरी करण्याचे दडपण नक्कीच असेल.

मोहम्मद शमीने 51 धावांत 5 विकेटस् घेतल्या. मात्र, शार्दूल ठाकूर चांगलाच महागात पडला. त्याने 10 षटकांत 78 धावा दिल्या, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे के.एल. राहुल दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एक किंवा दोन बदल करण्याची शक्यता आहे.

पावसाचे संकट

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये होणार्‍या दुसर्‍या वन डेवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसा वातावरण ढगाळ असणार आहे. सायंकाळनंतर पावसाची शक्यता आहे. सकाळी वादळ येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मेघगर्जनेची शक्यता असून पाऊसही पडू शकतो. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, जे दिवस पुढे जात असताना हळूहळू ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मीडिया मॅनेजरने मीडियाला सांगितले की, भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचे सावट असल्याने आम्ही काही विशेष व्यवस्था केली आहे. पाऊस पाहता या स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यात आली आहे. खेळपट्टी आणि मैदान कव्हर करण्यासाठी नवीन कव्हर्सही खरेदी करण्यात आली आहेत.

इंदूरमध्ये टीम इंडिया ‘अजिंक्य’

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वन डे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (24 सप्टेंबर) होणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. यावेळीही टीम इंडिया 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे, हा योगायोगच म्हणावा लागेल. 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 5 गडी राखून पराभव केला. इंदूरमध्येही कांगारूंचा मार्ग सोपा नसेल, कारण होळकर स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड मजबूत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय विक्रमांबद्दल जाणून घेऊया.

होळकर क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व आहे. टीम इंडियाच्या येथील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग सोपा नसेल. भारताने इंदूरमध्ये आतापर्यंत 6 वन डे सामने खेळले आहेत. टीम इंडियाने हे सर्व सामने जिंकले आहेत. या मैदानावर भारतीय संघाने जगातील निवडक संघांना पराभूत केले आहे. या काळात भारताने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसत आहे.

इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे सामना खेळण्याची ही दुसरी वेळ असेल. याआधी 2017 मध्ये याच स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने कांगारूंचा 5 विकेटस् राखून पराभव केला होता. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणार्‍या हार्दिक पंड्याला सामनावीरचा किताब देण्यात आला होता.

6 वर्षांपूर्वी इंदूरमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला, तो दिवस 24 सप्टेंबर 2017 होता. यावेळीही टीम इंडिया 24 सप्टेंबरला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे, हा योगायोगच म्हणावा लागेल. एकूणच आकडेवारी टीम इंडियाच्या बाजूने आहे. अशा स्थितीत भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण आहे.

Back to top button